आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये डाळ, भाजी, चपाती, भात यांसारख्या पदार्थांचा सर्रास समावेश करण्यात येतो. अनेक पोषक पदार्थांनी परिपूर्ण अशा आपल्या जेवणात मुख्यतः चपाती आणि भाताचा समावेश करण्यात येतो. कार्ब्स आणि कॅलरी यांनी परिपूर्ण असणाऱ्या या दोन्ही पदार्थांचा भारतीय जेवणामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येतो. परंतु अनेकदा लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की, रात्रीच्या जेवणामध्ये चपाती खाणं चांगलं असतं की, भात? चपाती गव्हापासून तयार करण्यात येते यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. तर भात हा तांदळापासून तयार करण्यात येतो, त्यामुळे यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे भात पचण्यास हलका असतो. जाणून घेऊया चपाती किंवा भातापैकी कोणत्या पदार्थाचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
चपाती की, भात काय खाणं ठरतं फायदेशीर?
तज्ज्ञांच्या मते, तसं पाहायला गेलं तर आहारात चपातीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. परंतु आहारात दोन्ही पदार्थांचा समतोल राखणंही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. पण प्लेन राइसचा जेवणात समावेश करणं शक्यतो टाळा. भात डाळीसोबत किंवा भाज्यांसोबत खाणं फायदेशीर ठरतो.
रात्रीच्या जेवणात चपातीचा समावेश करावा की भाताचा?
रात्रीच्या जेवणामध्ये चपातीचा समावेश करावा. कारण भातापेक्षा चपाती खाणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.
या पदार्थांमध्ये किती पोषक घटक असतात?
1/3 कप भातामध्ये 80 कॅलरी, 1 ग्रॅम प्रोटीन, 0.1 ग्रॅम फॅट्स आणि 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. तेच एका मध्यम आकाराच्या चपातीमध्ये 71 ग्रॅम कॅलरी, 3 ग्रॅम प्रोटीन, 0.4 ग्रॅम फॅट आणि 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. याव्यतिरिक्त चपातीमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, कॅल्शिअम आणि आयर्न असतं. एवढचं नाही तर एका चपातीमध्ये एक कप भातापेक्षा जास्त फायबर असतं. जे पाचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाणं फायदेशीर ठरतं.
चपाती खाण्याचे फायदे :
पचन क्रिया सुधारण्यासाठी -
चपातीमध्ये भातापेक्षा जास्त फायबर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन पोट साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे बद्धकोष्ट, अपचन आणि कॉन्स्टिपेशन यांसारख्या समस्यांपासून सुटका होते.
आळस आणि झोप -
चपाती खाल्यानंतर आळस आणि जास्त झोपही येत नाही. परंतु भात खाल्यामुळे आळस तर येतोच पण अनेकदा झोपही येते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर -
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चपाती खाणं फायदेशीर ठरतं. चपातीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्सच्या डायजेशनसाठी शरीरातील अधिक एनर्जी वापरण्यात येते. ज्यामुळे वजन कमी होतं.
ओवरइटिंगपासून दूर रहा -
चपाती पचण्यास भातापेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला सतत भूक लागत नाही.
असा तयार करा हेल्दी भात :
- तांदूळ कुकरऐवजी एखाद्या पातेल्यामध्ये जास्त पाण्यामध्ये शिजवा. उकळल्यामुळे यातील स्टार्च निघून जातं. स्टार्च असलेलं पाणी काढून टाका. यामुळे भाताची न्यूट्रिशियस वॅल्यू वाढते.
- भात डाळीसोबत खा. या कॉम्बिनेशनमुळे शरीराला अमीनो अॅसिड मिळण्यास मदत होते.
- जर तुम्हाला भात खाणं आवडत असेल तर त्यासोबत आहारात चपाती, भाजी, डाळ, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. भातासोबत या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्हाला आवश्यक ती पोषक तत्व मिळण्यासही मदत होते.
- प्लेन, पॉलिश व्हाइट राइसऐवजी अनपॉलिश्ड, ब्राउन किंवा रेड राइसचा आहारात समावेश करावा.