- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार, bhalwankarb@gmail.com
घरोघरी मुलाबाळांना विचारलंत की तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं, तर बहुतेक वेळा उत्तर मिळेल पिझ्झा किंवा पास्ता. हे आपल्या भारतातीलच चित्र नाही, तर जगभरात हेच चित्र आहे. दरवर्षी जगभरात घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये सर्वोत्तम जागतिक खाद्यपदार्थ किंवा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणून इटालियन पदार्थांना सर्वोच्च स्थान दिले जात आहे. भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या देशांपैकी हा एक देश. अतिप्राचीन संस्कृती, धार्मिक, कलासाहित्यविषयक चळवळीच्या केंद्रस्थानी वेळोवेळी राहिलेल्या इटलीच्या अस्तित्वाचा गाभा आहे कुटुंब. इटालियन संस्कृतीत कुटुंबाला अतिशय महत्त्व आहे, त्यातही कुटुंबप्रमुख आई फार महत्त्वाची असते. तिने रांधलेल्या स्वयंपाकाचा कुटुंबाने एकत्र येऊन आस्वाद घेण्याची प्रथा इथे पिढ्यान्पिढ्या आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हीच संस्कृती काखोटीला मारून अनेक इटालियन कुटुंबांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. त्यांच्या आगमनाबरोबर अमेरिकेत अनेक ठिकाणी छोटी-छोटी उपाहारगृहे निघाली. या उपाहारगृहांनी आधी अमेरिकेला आणि नंतर अख्ख्या जगाला वेड लावलं. आंबवलेल्या मैद्याच्या पोळीवर टोमॅटोची चटणी (मारीनारा सॉस), चीझ आणि इतर पदार्थ घालून ही पोळी भट्टीत भाजायची, इतका साधा पदार्थ पण त्याचा दिमाख केवढा. २०१४ सालच्या जगप्रसिद्ध ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एलेन डिजेनेरेस या सोहळा सादरकर्तीने अचानक ‘बिग ममाज अँड पापाज पिज्झेरिया’ नावाच्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा मागवला. तिथे उपस्थित असलेल्या ब्रॅड पिट, मेरिल स्ट्रीप आणि हॅरिसन फोर्डसारख्या हॉलिवूडच्या दिग्गजांनी हा पिझ्झा खाल्ला. पिझ्झा घेऊन आलेल्या बिग ममाज अँड पापाजच्या मालकाला आपण एवढ्या बाप लोकांना पिझ्झा खाऊ घालणार आहोत, हे माहीत नव्हते. एबीसी नेटवर्कने या सोहळ्याचे प्रक्षेपण केले होते. एका अंदाजानुसार या कार्यक्रमात तीन मिनिटांची जाहिरात करणाऱ्याला साधारण एक्याऐंशी कोटी रुपये खर्च करावे लागले असते, पण एलेनची विनोदबुद्धी आणि पिझ्झाच्या लोकप्रियतेमुळे या अनोळखी पिझ्झा चेनला फुकटात जाहिरात मिळाली आणि रातोरात त्यांच्या पिझ्झाचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले.