श्रावण महिना फार पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक सण येतात. याचसोबत अनेक उपवासही येतात. मग घरात फराळी पदार्थांची लगबग असते. पण फराळी पदार्थांमध्ये समावेश होणाऱ्या रोजच्याच खिचडी आणि उपवासाची पुरी भाजी यांसारख्या पदार्थांचा कंटाळा येतो. अशातच जर एखादा वेगळा चटपटीत पण उपवासाला चालणारा पदार्थ शोधत असाल तर उपवासाची कचोरी तुम्ही ट्राय करू शकता.
कचोरीच्या सारणाचे साहित्य :
- रताळे पाव किलो
- उकडलेले दोन बटाटे
- खवलेला खोबरं एक वाटी
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ आणि साखर (चवीनुसार)
- 10 ते 12 चारोळ्या आणि बेदाणे
- 2 ते 3 हिरव्या मिरच्या
- तूप (आवश्यकतेनुसार)
कृती :
रताळी व बटाटे उकडून घ्या.
त्यानंतर सोलून एका बाउलमध्ये कुस्करून घ्या.
चवीनुसार मीठ घालून मिश्रण घट्ट मळा.
त्यानंतर थोड्या ओल्या कपड्यामध्ये झाकून बाजूला ठेवा.
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाका.
त्यात बारिक चिरलेल्या मिरच्या टाकून थोड्या तडतडू द्या.
त्यानंतर खवलेलं खोबरं, बेदाणे, चारोळ्या, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार साखर टाकून चांगलं परतून सारण तयार करा.
मळलेलं पीठ घेऊन द्रोणासारखा आकार करून त्यामध्ये सारण भरा.
गोल आकार देऊन सर्व बाजूंनी बंद करा.
कढईमध्ये तूप घ्या, तूप चांगलं तापल्यावर कचोऱ्या तूपामध्ये लालसर तळून घ्या.
गरमा गरम उपवासाच्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.