आता जवळपास सर्वांनाच ग्रीन टी चे फायदे माहीत असतील. खासकरुन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. तसेच हृदयरोग, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेटाबॉलिज्मसाठीही ग्रीन टी फायद्याची मानली जाते. इतकेच नाही तर ग्रीन टीमुळे त्वचेलाही अनेक फायदे होता. पण याचीही एक दुसरी बाजू म्हणजे ग्रीन टी चे जास्त सेवन केल्याने याने नुकसानही होतात.
अनेकांना कुणाकडून ऐकून किंवा कुठे वाचून असं वाटत असतं की, याने आरोग्याल अनेक फायदे होतात. हे खरंही आहे. पण ग्रीन टी चा दैनंदिन आहारात समावेश करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. चला जाणून घेऊ काही महत्त्वाच्या गोष्टी....
होऊ शकतात या समस्या
ग्रीन टीमध्ये असलेलं कॅफीन आणि टॅनिंसमुळे पोट बिघडू शकतं. कॅफीन आणि टॅनिंसमुळे शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढतं. हेच अॅसिड पचनक्रियेत समस्या निर्माण करतं.
ग्रीन टीच्या अधिक सेवनामुळे जळजळ, पोटदुखी, सतत जांभया येणे अशाही समस्या होऊ शकतात. खासकरुन ज्या लोकांना पेप्टिक अल्सर, अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफलक्ससारख्या समस्या असतात, त्यांनी ग्रीन टी घेऊ नये.
कसा कमी कराल त्रास?
वेगवेगळ्या शोधातून हे समोर आलं आहे की, चहामुळे गॅस्ट्रिक अॅसिड वाढतं. त्यामुळे ग्रीन टी कधीही रिकाम्या पोटी सेवन करु नका. अॅसिडीटीचे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी यात थोडं दूध वापरु शकता.
मुख्य फायदे -
वजन घटवण्यासाठी
ग्रीन टी मधील ‘एपिगॅलोकॅटोकिन’ तुमचे मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी तसेच जास्त लागणारी भूक कमी करण्यासाठी मदत करते. ‘एपिगॅलोकॅटोकिन’ घटकामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. 2-4 कप ग्रीन टीमुळे 70-80 कॅलरीज नियमित कमी होतात. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. ग्रीन टीमुळे भूकेवर नियंत्रण राहतं. तसेच फॅट बर्न होण्याची क्षमता सुधारते.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते
ग्रीन टी शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते. रक्तवाहिन्या मोकळ्या राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, हृदयाचे कार्य सुरळीत चालते. हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ग्रीन टी’ अतिशय आरोग्यदायी आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
‘ग्रीन टी’मध्ये असणारे अॅन्टीबॅक्टेरिअल घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी येणारा ताप, अंगदुखीही दूर होण्याची शक्यता असते.