नवीन वर्षाचा पहिला सण पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. मकरसंक्रांत या सणाला घरामध्ये खास पारंपरिक पदार्थ केले जातात. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया. हे पदार्थ तुम्ही या मकरसंक्रातीला तयार करून घरातल्या मंडळींना खूश करू शकता.
तिळाचे लाडू - मकरसंक्रांतीसाठी घरोघरी तिळाचे लाडू तयार केले जातात. तीळ शरीराला उष्णता देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तिळामध्ये असलेले कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम यासारखे पौष्टीक घटक हृदयासाठी फायदेशीर ठरतात. गूळ आणि तीळ एकत्र करून लाडू तयार केले जातात.
शेंगदाण्याची चिक्की - मकरसंक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने ती शरीरासाठी उपयुक्त असतं.
तिळाची चिक्की - हिवाळ्यामध्ये आहारात तिळाचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गूळ आणि तीळ एकत्र करून तिळाची चिक्की तयार केली जाते. तिळामध्ये सेसमीन नावाचं एक अॅन्टीऑक्सिडंट आढळून येतं. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचं काम करतात.
चुरमुऱ्याचे लाडू - चुरमुऱ्याचे लाडू हे लहान मुलांना प्रचंड आवडतात. गुळाचा पाक आणि चुरमुरे वापरून गोड लाडू हे अनेकांच्या घरी खास मकरसंक्रांतीसाठी तयार केले जातात. चुरमुऱ्याचे लाडू हे शरीरासाठी उत्तम असतात.
पातिशप्ता - मकरसंक्रांतीसाठी प्रत्येक बंगाली कुटुंबात पातिशप्ता हा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. मैदा, गहू किंवा तांदळाचं पीठ, गुळ, नारळ, दूध यासह अन्य काही पदार्थ वापरून पातिशप्ता हा गोड पदार्थ तयार केला जातो.
पुरणपोळी - पुरणपोळी हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात हमखास पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पुरणपोळी तयार केली जाते.
गुळपोळी - गूळ, तीळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे वापरून गुळपोळी तयार केली जाते. गुळपोळी हा पौष्टीक पदार्थ चिमुकल्यांना अतिशय आवडतो.