तिखट आणि झणझणीत रावण पिठलं ! पुणे : रामराम पाव्हणं ! आवं दर टायमाला गावाकडचं खायला गावाला जायची गरज न्हाई बर का ! गावाकडं घराघरात होनार रावण पिठलं घरी केलं तरी बी तुम्हाला गावची आठवन येईल. पन ऐका, हे पिठलं नावाप्रमाणे रावणाची याद देनार आहे. तेजतर्रार पिठल्याच्या एकाच घासात डोळ्यात खळ्ळकन पाणी येतंय. तवा तिखट खायचं असलं तर झनका मारणारं रावण पिठलं कराच.पण त्याच्यासोबत जोंधळ्याची गरमागरम भाकर, इंद्रायणीचा भात, खापाच दही आणि एका बुक्कीत फुटलेला कांदा घ्यायचं ध्यानात ठेवा म्हणजे झालं !
साहित्य :
हरभरा डाळीचे पीठ : एक वाटी
लसूण बारीक चिरलेला : पाव वाटी
तेल : एक वाटी
लाल : एक वाटी
पाणी :दोन वाट्या
मोहरी, हिंग, हळद :फोडणीकरिता
मीठ : चवीपुरते
कोथिंबीर : वाटीभर
कृती :
- दोन वाट्या पाणी उकळण्यास ठेवा.
- एका वाटीत लाल तिखट, हळद, हिंग एकत्र करून घ्या.
- कढईत अर्धी वाटी तेल टाकून त्यात मोहरी टाका.
- मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण घाला. लसूण खरपूस होऊ द्या.
- लसूण सोनेरी झाल्यावर त्यात लाल तिखटाचे मिश्रण घालून तेलात मिक्स करा.
- मिश्रण टाकण्याआधी गॅस मंद ठेवा. त्यामुळे मिश्रण जळणार नाही.
- या मिश्रणात लगेचच उकळते पाणी घाला.त्यात अर्धी वाटी कोथिंबीर घाला
- याच पाण्यात मीठ घालून गॅस बारीक करावा.
- उकळी आलेल्या पाण्यात पीठ भुरभुरवण्यास सुरुवात करावी.
- संपूर्ण वाटीभर पीठ टाकून झाल्यावर पळीने मिश्रण हलवावे
- मिश्रणात झालेल्या गुठळ्या पळीने फोडून घ्याव्यात. आवडत असल्यास लहान गुठळ्या तशाच ठेवाव्यात.त्या शिजल्यावर उत्तम लागतात.
- सर्वात शेवटी झाकण ठेवून पिठले दोन मिनिटे वाफवावे.
- गॅस बंद करून उरलेली कोथिंबीर घालावी.
- हे पिठले सर्व्ह करताना त्यावर उर्वरित कच्चे तेल टाकावे.
- झणझणीत रावण पिठले तयार.