आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. अनेक लग्न समारंभांमध्येही बुफे ही पाश्चिमात्य जेवणाची पद्धत अवलंबली जाते. पण असं उभं राहून जेवण करण्याची तुमची सवय किंवा पद्धत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, उभे राहून जेवण केल्याने शरीरावर काय आणि कसा प्रभाव पडतो.
पचनक्रियेत होते समस्या
घरी किंवा ऑफिसमध्ये अनेकदा काही लोक घाईघाईत उभ्याने जेवण करु लागतात. पण जेव्हा आपण उभं राहून जेवण करतो तेव्हा ते खाल्लेलं अन्न पचन होण्यास जास्त वेळ लागतो. सोबतच घाईगडबडीत व्यक्ती जास्त खातो. त्यामुळे जास्त खाणं आणि त्याची हळू होणारी पचनक्रिया पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचं कारण ठरु शकते.
उभं राहून जेवल्याने पॉश्चर बिघडतं
उभं राहून जेवण केल्याने व्यक्ती खूप वाकतात. त्यासोबतच शरीराला रिलॅक्स वाटावं किंवा आराम मिळाला म्हणून शरीराच्या एका भागावर जास्त जोर देतो. रोज असं केल्याने याचा प्रभाव मणक्यावर पडू लागतो. तेच खाली बसून जेवण केल्याने बॉडी पॉश्चरमध्ये सुधारणा होते. त्यासोबतच बसून जेवण केल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. पायांची घडी घालून बसल्याने नसांमधील ताण दूर होतो आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.
जमिनीवर बसून जेवण करा
(Image Credit : pranayoga.co.in)
आपण रोज खाली जमिनीवर बसून जेवण करण्याची सवय लावली पाहिजे. रोज खाली बसून जेवण केल्याने शरीर आणकी लवचिक होतं. खाली बसून आपण ज्याप्रकारे जेवण करतो, ते पाठीच्या मणक्यालाही फायदा होतो. याने तुम्हाला पाठीसंबंधित समस्या होण्याचा धोका कमी असतो.
वजन नियंत्रित राहतं
अलिकडे वजन वाढण्याची समस्या अनेकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे. वाढतं वजन म्हणजे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या हे ठरलेलंच. जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्ही खाली बसून जेवण करण्याची सवय लावली पाहिजे. याने तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल. खाली बसून जेवण केल्याने पोट लवकर भरतं आणि अशात वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
पचनक्रिया सुधारते
आधी लोक खाली बसून व्यवस्थित मांडी घालून जेवण करायला बसत असत. आज ही पद्धत कमी बघायला मिळते. कारण अनेकांकडे आता डायनिंग टेबल आला आहे. पण मांडी घालून जेवायला बसणे ही एकप्रकारे योगाभ्यासाची क्रियाच आहे. मांडी घालून बसणे, घास घेण्यासाठी खाली वाकणे आणि सरळ होऊ तो चावणे या सर्व प्रक्रियेमुळे पोटात असलेल्या मसल्सना पचनक्रियेसाठी गरजेचा रस काढण्यास मदत मिळते. याने तुमची पचनक्रिया सुधारते.