श्रावण महिन्याला सुरुवात झाली की, वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. मग नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला यांसारखे सण साजरे करण्यात येतात. घरात नैवेद्य तयार करण्यासाठी गोड पदार्थ तयार करण्यात येतात. पण रोजच्या धावपळीच्या दिनक्रमामुळे अनेकदा घरात पदार्थ तयार करणं कठीण होतं. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या मिठाईंची मागणी वाढते. हीच मागणी लक्षात घेऊन बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फ्लेवर्सच्या स्वादिष्ट मिठाई आल्या आहेत. पण या मिठायांमध्ये सर्वात जास्त चर्चा एका मिठाईची होत आहे ती म्हणजे, सोन्याची मिठाई. ऐकून धक्का बसला ना? ही मिठाईच सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. ही मिठाई 9 हजार रूपये प्रतिकिलो दराने विकण्यात येते. जाणून घेऊयात या मिठाईबाबत...
सुरच्या एका मिठाईच्या दुकानात रक्षाबंधनसाठी तयार करण्यात आलेल्या या खास मिठाईने सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. या मिठाईमध्ये सोन्याचा वापर करण्यात आल्याने या मिठाईची किंमत जास्त ठेवल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.
जास्त करून मिठाईवर चांदीचा वर्ख लावण्यात येतो. पण या मिठाईमध्ये शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. त्यामुळे या मिठाईची किंमत 9 हजार प्रतिकिलो ठेवण्यात आली आहे. ही मिठाई सूरत शहरात लोकांच्या आकर्षणाचा विषय बनली आहे. या दुकानात चांदीच्या वर्खाच्या मिठाईही ठेवण्यात आल्या आहेत ज्यांची किंमत प्रतिकिलो 600 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत आहे.
आरोग्यदायी आहे सोन्याची मिठाई
सूरतच्या 24 कॅरेट मिठाई मॅजिक दुकानात मिळणारी ही शुद्ध सोन्याची मिठाई आरोग्यासाठी गुणकारी आहे. सोन्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. त्यामुळे आरोग्याचा विचार करून अनेक लोकं या मिठाई विकत घेत आहेत.