टेलमध्ये गेल्यावर काही पदार्थांची ऑर्डर दिल्यानंतर जेव्हा तो पदार्थ प्रत्यक्ष टेबलावर मांडला जातो, हो... मांडलाच जातो, ठेवला जात नाही, त्यावेळी केवळ त्या पदार्थाकडे बघूनच मनाची तृप्ती होते. त्या पदार्थाचा तो साग्रसंगीत थाट मोडावासा वाटत नाही; पण जितका तो पदार्थ देखणा असतो तितकाच तो रुचीरंजन करणाराही असतो. अशा मोजक्या पदार्थांच्या यादीत खाव स्यू ई (Khow Suey) या पदार्थाचे नाव अग्रगण्य आहे.
...तर मुद्दा असा की, खाद्यपदार्थांच्या दुनियेत खाव स्यू ई या पदार्थाची वर्गवारी ही नूडल सूप श्रेणीत होत असली तरी, पदार्थाची मांडणी नेत्रसुखद असते. कारण नूडल्स आणि नारळाच्या दुधात बनविलेली व्हेज ग्रेव्ही आणि त्याचसोबत तळलेले दाणे, लसूण, कांदा, लिंबाची फोड, पातीचा कांदा, असे सारे साग्रसंगीत सोबत मांडून आणि मग एकत्रित केले की, त्यातून होणारी रसनिष्पत्ती मेंदूत छान चवीची एक आठवण कोरते. मुंबईतील अनेक कॉन्टिनेन्टल फूड देणाऱ्या हॉटेलमध्ये हा पदार्थ उपलब्ध आहे. साधारणपणे दोघांना पुरेल इतक्या क्वान्टिटीमध्ये हा पदार्थ हॉटेलमध्ये मिळतो. मात्र, त्याची चव जिभेला अशी काही मोहिनी घालते की, पुढ्यात आलेला हा पदार्थ संपायच्या आतच त्याच पदार्थाची ऑर्डर हमखास पुन्हा दिली जाते.
मराठी जेवणात तसा कल्पवृक्ष फळाचा वापर सढळ असला तरी त्याच्या दुधाचा वापर मात्र तुलनेने कमी आहे. मात्र, सोलकढी वगळता काहीशा उग्रभासी वासांच्या घटकांतून साकारलेल्या मसाल्यामध्ये नारळाचे दूध मिसळून केलेली ग्रेव्ही त्या अन्नपदार्थाचा स्वाद लीलया वाढवते. खाव स्यू ई हा मुळात बर्मी पदार्थ. आताचे म्यानमार. तिथून हा पदार्थ ईस्ट इंडियन कम्युनिटी आपल्यासोबत भारताच्या इतर भागांत घेऊन आली आणि तिथून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मेमन कुटुंबीयांसोबत हा पदार्थ पाकिस्तानात पोहोचला. कालौघात या पदार्थाला भारतीय मसाले, घटक यांच्या फ्युजनचा स्पर्श झालाच आणि त्याच्या चवीत आता भारतीय अंतरंगही सामावले आहे.