सध्या वातावरणामध्ये भयंकर उकाडा वाढला असून अनेकांना सन स्ट्रोकचा सामना करावा लागत आहे. वातावरातील वाढलेल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोकचा सामना करावा लागतो. अनेकदा लोक अति उष्णतेमुळे सन स्ट्रोकच्या जाळ्यामध्ये येतात. अनेकदा याकडे दुर्लक्षं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हासोबत वारेही वाहतात. यामुळे सन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. वातावरणामध्ये होणाऱ्या या बदलांमुळे शरीरामध्येही उष्णता वाढते. सन स्ट्रोकमुळे डोकेदुखी, अशक्तपणा, अंगदुखी, सतत तोंड कोरडं पडणं, उलट्या होणं. चक्कर येणं. ताप येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागणं, हात-पाय किंवा डोळे जळजळणं, शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणं, तसेच ब्लड प्रेशर लो होणं. यांसारखी लक्षणं दिसून येतात.
लक्षणांकडे दुर्लक्षं करणं ठिक नाही
सन स्ट्रोकनंतर शरीरामध्ये उष्णता वाढते. त्याचबरोबर थकवाही येतो. अंग दुखू लागतं आणि शरीराचं तापमान वाढू लागतं. अनेकदा ताप तर 105 किंवा 106 डिग्री सेल्सिअसवर पोहोचतो. अशा अवस्थेमध्ये ब्लडप्रेशर लो होतं आणि लिव्हर-किडनीमध्ये सोडियम पोटॅशिअमचं संतुलन बिघडतं. अशातच व्यक्तीची शुद्ध हरपते आणि ब्रेन किंवा हार्ट स्ट्रोकची स्थितीही उद्भवते. जर वेळीच उपचार केले नाही तर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो
सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय :
हिट स्ट्रोक किंवा सन स्ट्रोक होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, शरीरामध्ये होणारी पाण्याची कमतरता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये वाढलेला वातावरणातील उकाडा आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडणं टाळा. आवश्यक कामामुळे घरातून बाहेर पडण्याशिवाय काही पर्यायच नसेल तर घरातून बाहेर पडताना डोळे, कान आणि नाक स्कार्फच्या सहाय्याने झाकून घ्या. त्याशिवाय तुम्ही छत्रीचाही वापर करू शकता. याव्यतिरिक्त अल्कोहोल आणि कॅफेनयुक्त पेय पदार्थ घेणं शक्यतो टाळा. अशातच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी साखर, मीठ, लिंबू किंवा बेकिंग सोडा पाण्यासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. मीठ शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच साखर शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे या पदार्थांचा उन्हाळ्यामध्ये आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
कांद्याचा रस
कांद्याचा रस हिट स्ट्रोक रोखण्यासाठी सर्वात उत्तम घरगुती उपाय मानला जातो. यामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. तज्ज्ञांच्या मते, कांद्याचा रस कानांच्या मागे किंवा गळ्यावर लावल्याने शरीराचं तापमान कमी होतं. याव्यतिरिक्त तुम्ही जीरं आणि मधासोबत कांदा एकत्र करून त्याचं सेवन करू शकता. चटणी किंवा सलाडमध्ये कच्चा कांदाही शरीर थंड करण्यासाठी मदत करतो.
लिंबू
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे तुमचं शरीर अनेक आजारांपासून दूर राहतं आणि शरीरामधील पाण्याची कमतरता दूर होते. तसेच शरीराला ऊर्जाही मिळते.
सब्जा आणि बडिशोप
सब्जा गुलाब पाण्यासोबत एकत्र करून प्यायल्याने शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. बडिशोप रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी उठून पाण्याचं सेवन करा. शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासोबत उष्णतेपासून बचाव करण्यासाठीही मदत होते.
कोथिंबीर आणि पुदिना
हिरव्या कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये डायट्री फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त यामध्ये आयर्न, मॅग्नेशिअमही मुबलक प्रमाणात असतं. हे व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. हिरवी कोथिंबीर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणइ त्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. त्यामध्ये साखर एकत्र करा. हे पाणी प्यायल्याने सन स्ट्रोकची समस्या दूर होण्यास मदत होते.
कैरीचं पन्हं
कैरीचं पन्ह शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पन्हं तुम्हाला हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन इत्यादींपासून स्वतःचं रक्षण करू शकता. अनेकदा उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह करण्यात येतं. अनेक लोक याचं सेवनही करतात. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. कैरीचं पन्ह एक कूलिंग एजेंट आहे. जे शरीराला डिहायड्रेशनपासून दूर ठेवतं. हे प्यायल्याने शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोटॅशिअम असतं. जे शरीरासाठी आवश्यक असतात.
चिंचेच पाणी
चवीला आंबट लागणारं चिंचेच पाणी कोणाला आवडत नाही. चिंचेमध्ये सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी अनेक औषधी गुणधर्म असतात. चिंचेमध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणात असतात. चिंच गरम पाण्यामध्ये भिजवा आणि हे एक किंवा अर्धा चमचा साखरेसोबत प्या. हे प्यायल्याने शरीराचं तापमान सामान्य होण्यास मदत होते.
ताक आणि नारळाचं पाणी
ताकामध्ये प्रोबायोटिक्स मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन आणि खनिजं प्रदान करण्यासाठी मदत करतात. तसेच नानारळाचं पाणी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक पद्धतीवे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवून शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही आणि हे तुम्हाला सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त यामध्ये असलेले विटामिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नशिअम ब्लड-प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं.
कोरफडीचा ज्यूस
कोरफडीचा ज्यूस आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त हे एक एडाप्टोजेन म्हणून ओळखलं जातं. जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. अनेक डॉक्टर्सही उन्हाळ्यामध्ये कोरफडीचा वापर करण्याचा सल्ला देत असतात.
टिप : वरील सर्व उपाय हे घरगुती उपाय आहेत. हे केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.