-माधुरी पेठकरदिवसाच्या कोणत्याही वेळतली भूक भागवणारा पदार्थ म्हणजे सॅण्डविच. यातल्या कच्च्या, अर्ध कच्च्या भाज्यांच्या वापरामुळे यात ब्रेड असलं तरी या पदार्थाकडे पौष्टिक म्हणून पाहिलं जातं. साधं सॅण्डविच, ग्रिल्ड सॅण्डविच, पनीर, चीज असे सॅण्डविचचे अनेक प्रकार आहेत. आणि सॅण्डविच प्रेमींमध्ये हे सर्व प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. भूक किती आणि कोणत्या वेळी लागली यावर सॅण्डविचचा कोणता प्रकार खायचा हे ठरतं. हलकी भूक असेल तर साधं चटणी आणि कच्च्या भाज्या भरलेलं सॅण्डविचही पुरतं. पण भूक चांगलीच चवताळलेली असेल तर मग पनीर, चीज, ग्रिल्ड असे हेवी प्रकार खाल्ले जातात.
देशभरात रोजच्या पदार्थांमध्ये नवनवीन बदल होवून तेच पदार्थ नव्या चवी ढवीत, नव्या रूप रंगामध्ये येतात आणि खवय्यांना खाण्यासाठी आकर्षित करतात. सध्या मुंबईच्या एका गल्लीत सॅण्डविचचा असाच एक प्रकार अवतरला आहे. या सॅण्डविचचं रंग रूप आणि त्यातला स्टफ एवढा जबरदस्त आहे की त्याला महा, जायंट, बिग ही विशेषणं कमी पडतील की काय म्हणून त्याचं ‘बाहुबली सॅण्डविच’ असं नामकरण करण्यात आलं आहे.
बाहुबली सॅण्डविच हे तीन थरांचं असून एका सॅण्डविचमध्ये चार सॅण्डविच ब्रेड वापरण्यात आलं आहे. 15 खाद्य सामुग्री वापरून हे सॅण्डविच बनवण्यात आलं आहे. घाईच्या वेळेत पोटभरीचा पदार्थ म्हणून सॅण्डविचकडे पाहिलं जातं. कमी सामुग्रीत पटकन होणारं सॅण्डविच म्हणून सगळ्यांना हवंसं वाटतं. पण या बाहुबली सॅण्डविचमध्ये वापरण्यात आलेली सामुग्री आणि त्याचा प्रत्यक्ष आकार पाहूनच पोट भरायला होतं.
हे बाहुबली सॅण्डविच बनवताना बेबी कॉर्न, कांदा, टोमॅटो, कोबी, रंगीबिरंगी सिमला मिरची, भोंगी मिरची, चीज, बटर, हिरवी चटणी, लाल तिखट चटणी, अननस, संत्र्यांचा मुरांबा, कच्ची कैरी, बीटरूट, वेफर्स एवढं जिन्नस वापरलं जातं.
हे बाहुबली सॅण्डविच करताना पहिल्या ब्रेडवर हिरवी चटणी लावली जाते. मग त्यावर थोडे एबी कॉर्न, कांदा, परत थोडी हिरवी चटणी, मग रंगीत सिमला मिरची, किसलेलं चीझ आणि बटरची एक स्लाइस ठेवली जाते मग दुसरा ब्रेड ठेवून त्यावर अननस, आॅलिव्ह, भोंगी मिरची,मेयोनीज आणि भरपूर चीझ घातलं जातं. शेवटचा थर करताना त्यावर आधी झणझणीत लाल चटणी लावली जाते. मग त्यावर टोमॅटो, कोबी, मेयो, कच्ची कैरी, बीटरूट ठेवलं जातं. नंतर त्यावर स्पेशल मसाला भुरभुरला जातो. नंतर परत भरपूर चीझ किसून टाकलं जातं. नंतर त्यावर आणखी एक ब्रेड ठेवला जातो. शेवटी कटरनं सॅण्डविचचे चौकोनी तुकडे केले जातात. हे सॅण्डविच खायला देताना त्यावर परत चीज किसलं जातं. वेफर्स ठेवले जातात. असं हे बाहुबली सँण्डविच.
एकाचवेळेस गोड, तिखट, आंबट आणि कुरकुरीत लागणारं हे बाहुबली सॅण्डविच आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा पोहोचेल तोपर्यंत ही माहिती वाचूनच त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही. आणि माहिती वाचूनही पोट भरणार नसेल तर मग घरच्याघरी एकदा करून पाहायला हरकत नाही.