पुणे : भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. मीठ जास्त झालेल्या भाजीला अनेकदा कचऱ्याची कुंडीही दाखवली जाते. पण आता काळजी नको, खारटपणा कमी करण्यासाठीचे हे उपाय वापरा आणि भाजीची चव बदला. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय.
बटाटा : हा खारटपणा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. सहसा बटाटा सर्व भाज्यांमध्ये घातला जातो. त्यामुळे भाजीत पाणी घालून कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून शिजवा. बटाटा आपोआप मीठ शोषून घेईल.
कणकेचा उंडा : वाचायला विचित्र वाटलं तरी कणकेचा घट्ट गोळा उकळत्या रश्श्यात टाका. छान १० मिनिटे उकळी आल्यावर गोळा बाहेर काढून टाका. हा गोळा मीठ आणि मसाला पण शोषून घेतो. नंतर भाजीची चव बघून आवश्यकता असल्यास मसाला घाला.
लिंबू :लिंबूदेखील खारटपणा कमी करण्याचा नामी उपाय आहे. विशेषतः पोहे, उपीट, सांजा अशा पदार्थात मीठ अधिक झाल्यास लिंबाचे थेंब टाका. लिंबू प्रमाणात टाकावे नाहीतर पदार्थ आंबट होऊ शकतो.
दही व साय : अनेक मसालेदार भाज्यांमध्ये मीठ जास्त झाल्यास हा हमखास चालणारा उपाय आहे. फार आंबट नसलेले दही आणि साय एकत्र करून भाजीत टाकल्यास खारटपणा आणि जळजळीतपणाही कमी होतो.