- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारbhalwankarb@gmail.com
गेल्यावेळी आपण केचप या जगभरात लोकप्रिय असलेल्या सॉसबद्दल बोलत होतो. केचपचे उगमस्थान चीन आहे आणि मुळात त्यात टोमॅटो नव्हते ही माहिती आज सांगून पटणार नाही; पण ती खरी आहे. ब्रिटिश दर्यावर्दींनी हा सॉस चिनी खलाशांकडून चाखला आणि त्याच्या प्रेमात पडल्यामुळे आपल्याबरोबर इंग्लंडला नेला. त्याची चिनी पाककृती इतकी बदलली की मुळातलं केचप आणि ब्रिटनमध्ये बनलेलं केचप यात काहीही समानता राहिली नाही. केचपमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा प्रयोग होत होता; पण त्यात टोमॅटो नव्हता याला विशेष कारण होतं.
सोळाव्या शतकात टोमॅटो इंग्लंडला पोहाेचला. टोमॅटो विषारी आहे असा समज लवकरच पसरला. कारण, टोमॅटो आम्लयुक्त असतात आणि त्याकाळी तिथे वापरण्यात येणाऱ्या प्लेट्समध्ये शिसं असे. शिशाचा आणि टोमॅटोचा संयोग झाल्यावर काही जणांना विषबाधा झाली आणि लगोलग टोमॅटोवर बंदी आली, ती बराच काळ टिकली. टोमॅटो लावला जाई तो बागेची शोभा वाढवण्यासाठी. जेम्स मीझ नावाच्या अमेरिकन माणसाने टोमॅटो वापरून केचप बनवलं. त्याने टोमॅटो वापरण्याचे कारण त्याची चव नव्हे, तर टोमॅटोला ‘लव्ह ॲपल’ असं संबोधण्यात येई हे होतं. टोमॅटो कामोत्तेजक आहे असं त्याचं मत होतं आणि टोमॅटोचं केचप बनवून त्याने एका अफलातून सॉसचा शोध लावला. त्याची चव भन्नाट होती आणि लवकरच टोमॅटो केचप लोकप्रिय झालं.
पंचवीसएक वर्षांनी त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं; पण टोमॅटो फार टिकत नसत, त्यामुळे केचप कंपन्या ते टिकवण्यासाठी हानीकारक रसायनं वापरत. व्हिनेगर आणि साखर वापरून टोमॅटो केचप टिकू शकतं, हा शोध लावला हेन्री हाईन्सने. त्याचा स्वतःचा टोमॅटो केचप कारखाना होता. आता केचप वर्षभर मिळू लागलं, लोक बिनधास्त केचप खरेदी करू लागले. अमेरिकेच्या फास्टफूड क्रांतीने केचपच्या प्रचार आणि प्रसाराला हातभार लावला. भारतात फास्ट फूडचं लोण येण्याआधीच मध्यमवर्गीय घरांत केचपने प्रवेश केला होता. घरी केलेल्या खाद्यपदार्थांबरोबर, अगदी पोळीबरोबरसुद्धा केचप खाल्लं जाऊ लागलं आणि आताच्या खाद्यजत्रेत जवळजवळ सर्व फास्टफूड पदार्थांबरोबर केचपचा समावेश अनिवार्य झाला आहे.