प्रत्येक बाबतीत पैशानं परवडणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसं चालेल? आणि प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा काय परवडतं यापेक्षाही काय चांगलं याचा विचार व्हायला हवा.आता आपल्या स्वयंपाकघरातल्या अॅल्युमिनियमच्या भांड्यांचंच घ्या ना. आता तुम्ही म्हणाल त्या बिचाऱ्या अॅल्युमिनियमच्या भांड्याचा आणि आरोग्याचा कोणता आलाय संबंध? पण संबंध आहे.
अनेक संशोधनातून हे सिध्द झालं आहे की अॅल्युमिनियमची भांडी आरोग्यास हानिकारक असतात. अॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करताना भांड्यामधील अॅल्युमिनियम हे पदार्थात आणि पाण्यात मिसळतं आणि खाण्या-पिण्याद्वारे ते आपल्या पोटात जाऊन रक्तप्रवाहात मिसळतं. आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात ते साठून राहतं. त्याचा परिणाम अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. कोणाला हायपर अॅसिडिटी, अल्सर, अपचन होतं तर कोणाला इसब, काळे डाग, कोंडा, अत्यंत दाह यासारख्या त्वचाविकारांना सामोरं जावं लागतं. तर कोणाला अॅस्टोपोरोसिससारखे आजार जडतात. पण सर्वांमध्ये सारखा दिसून येणारा परिणाम म्हणजे अॅल्युमिनियममुळे हाडांची वाढ खुंटते. अॅल्युमिनियममध्ये विषारी घटक असतात जे मानवाच्या आरोग्यला हानिकारक असतात हे काही आज कालचं संशोधन नसून जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून हे सत्य पुढे आलं आहे. आणि म्हणूनच विकसित देशांनी आपल्या स्वयंपाक घरातून अॅल्युमिनियमची भांडी काढून टाकून नॉन स्टिक कूकवेअर आणले. पण विकसनील देशात मात्र अजूनही पैशाला परवडतात म्हणून अॅल्युमिनियमची भांडी घरापासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र वापरली जात आहेत. आणि ज्यांना परवडतं ते मग नॉन स्टिक भांडी वापरू लागले आहेत.