पोटदुखीचा त्रास सतावतोय किंवा मग वजन कमी करताय? अशावेळी अनेकदा हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हलके पदार्थ खाणं म्हणजे, असे पदार्थ जे पचण्यासाठी हलके असावे आणि त्यामध्ये जास्त फॅट्स किंवा कॅलरी असू नये. अशा पदार्थांमध्ये दूधी भोपळ्याचा समावेश करू शकता. दूधी भोपळ्यामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. तसेच पचण्यासाठीही हलका असतो. भारतील खाद्यसंस्कृतीमध्ये दुधी भोपळ्याच्या भाजीव्यतिरिक्त रायता, कोफ्ते, हलवा आणि भजीही तयार करण्यात येतात.
दुधी भोपळा आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण फार जास्त असतं. तसेच दुधी भोपळ्यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असतं. यामुळे पोटाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि बद्धकोष्टाची समस्या असणाऱ्यांसाठी दुधी भोपळा एक हेल्दी पदार्थ ठरतो. आज अशीच एक दुधी भोपळ्यापासून तयार करण्यात आलेली हेल्दी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं नाव आहे 'दुधी भोपळ्याचे पोहे'.
पोहे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
अर्धा कप दुधी भोपळा एक कप पोहे 100 ग्रॅम शेंगदाणे एक चमचा जीरं चिमुटभर काळी मिरी पावडर 2 हिरव्या मिरच्या एक चमचा गुळाची पावडर मीठ
दुधी भोपळ्याचे पोहे तयार करण्याची पद्धत :
- दुधी भोपळ्याची साल काढून तो किसून घ्या. पोहे पाण्याने धुवून त्यातील पाणी काढून बाजूला ठेवा.
- एका कढईमध्ये तूप गरम करा. त्यानंतर कापलेली हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या.
- फोडणी दिल्यानंतर किसलेला दुधी भोपळा त्यामध्ये टाकून एकत्र करा. 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घ्या.
- आता शेंगदाणे भाजून ते थोडे जाडसर बारिक करा आणि मिश्रणामध्ये एकत्र करा.
- थोड्या वेळानंतर पोहे त्यामध्ये एकत्र करा आणि मंद आचेवर शिजवून घ्या.
- आता त्यामध्ये मीठ, काळी मिरी आणि गुळाची पावडर किंवा गूळ एकत्र करा.
- पोहे तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं, हिरवी कोथिंबीर आणि लिंबू एकत्र करू शकता.