रोजच्या पोळी भाजीला टिष्ट्वस्ट देता येतील असे अनेक पर्याय आता मिळायला लागले आहेत. रॅप्स, रोल, श्वार्मा अशा नावांमुळे ते करायला कठीण जरी वाटत असले तरी हे सर्व प्रकार घरच्या घरी सहज करता येऊ शकतात. मिक्स व्हेज रोल रोज पोळी-भाजी खाणं अनेकदा नकोसं होतं. पण आपला रोजचा आहार तोच आहे म्हटल्यावर सकाळी तरी पोळीभाजी खाण्यावाचून पर्याय नसतोच. कारण दुसरं काही करायला सकाळच्या धावपळीत तेवढा वेळही नसतो. पण रविवारी आणि त्यात मित्र- मैत्रिणी घरी येणार म्हटल्यावर पोटभरीचं काहीतरी वेगळं करावं असे बेत रंगतात. काही वेळा पावभाजी, वडापाव, मिसळ, डोसा खायचाही कंटाळा येतो. घरात मुबलक भाज्या आणि भिजवलेली कणीक असते. अशावेळी साग्रसंगीत व्हेज कुर्मा, मिक्स व्हेज असा पंजाबी बेत आखावा असंही वाटू लागतं. पण ते करायचं तर मग वेळ जातो. आणि सुट्टीच्या दिवशी गप्पा गोष्टी करता याव्या, आराम करता यावा यासाठी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालून कसं चालेल? अशावेळी मग घरी आलेल्या मित्र मैत्रिणींना सोबत घेवून नेहेमीच्या पोळी भाजीला ट्विस्ट मारता येतो. असतील नसतील त्या सर्व भाज्या बारीक चिरायच्या. त्या भाज्या एकत्र हाफ फ्राय करायच्या. याला टोपिंग असं म्हणतात. आवडणाऱ्या भाज्या, चिज याची तयारी झाली की पोळ्या करायच्या. हाताशी शेजवान सॉस आणि मेयोनिज ठेवायचं. हे दोन्ही एकत्र करून मस्त क्रिमी तिखट चटणी तयार होते. नाहीतर नेहमीची हिरवी चटणीही पुरते. पोळीला यापैकी एक सॉस लावून वरून केलेली भाजी, कांदा आणि चीज घालून हा रोल तयार होतो. गप्पा मारत हा रोल खाण्याची मजा काही औरच. फ्रँकी मैद्याच्या पोळीला सॉस लावून त्यात कांदा घालून बटाट्याची भाजी घालावी. वरून चाट आणि फ्रँकी मसाला शिंपडावा आणि पुन्हा कांदा लिंबू पिळला की फ्रँकी तयार होते. असे विविध प्रकार तयार होतात. मेक्सिकन रॅप मैद्याच्या जाडसर लुसलुशीत रूमाली रोटीत रोलप्रमाणेच त्याला मॅयोनिज सॉस, वेगवेगळ््या भाज्या, टिक्की, काहीवेळी सालसा भरूनही हे रॅप तयार होतात. भरपूर मॅयोनिज सॉसमुळे त्याला क्रीमीश फील येतो. ग्रील केलेल्या भाज्या, कबाब, बटाट्याची टिक्की असे विविध प्रकार वापरून ते केले जातात. श्वार्मा श्वार्मा करताना धगघगत्या निखाऱ्यावर मोठया सळईला पनीर लावलं जातं. त्याला खालून कोळश्याची धग मिळते. श्वार्मासाठी वापरला जातो तो जाड पिटा ब्रेड. म्हणजेच एका अर्थानं मैद्याची जाडसर पोळी. ही पोळी निखाऱ्यावर भाजून त्यामध्ये टॉमेटो सॉस, ताहिनी (तिळाचा) सॉस, क्रीम लावून त्यात लागेल तसे निखाऱ्यावरचे भाजत असलेले पनीर, भरपूर कोबी, कांदा घालून दिला जातो. महत्वाचे म्हणजे यातले भाजलेले पनीर आणि सॉसचं कॉम्बिनेशन खावून झाल्यावरही जिभेवर रेंगाळतं. हे सर्व पदार्थ घरी सहज करता येऊ शकतात. मात्र पौष्टीकतेचा विचार करून त्यात मैद्याऐवजी कणकेच्या पोळीचाही वापर करता येतो. हे सगळं कसं करायचं यासाठी आॅनलाईन भरपूर साईट्स उपलब्ध आहेत. ---- भक्ती सोमण
पोळी भाजीमध्ये ट्विस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 9:14 PM