उन्हाळा म्हणजे आंब्यांच्या सीझन. आपल्यापैकी कदाचितच कोणी असेल ज्यांना आंबे आवडत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकजण आब्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. अगदी लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खूप आवडतो. आज आम्ही आंब्याच्या काही चवीष्ट रेसिपी सांगणार आहोत. त्यामुळे या हटके रेसिपींची चव चाखण्यासाठी तयार रहा. हे पदार्थ दिसायला जेवढे आकर्षक वाटतात तेवढे खाण्यासाठीही चवीष्ट आहेत. जाणून घेऊया काही हटके रेसिपी...
आंब्याचे पेढे
साहित्य :
खवा - 200 ग्राम, पिठी साखर - 50 ग्राम, आंब्याचा रस - 200 मिली, वेलची पूड, अक्रोड, बदाम-पिस्ता
कृती :
- कढईमध्ये खवा भाजून त्यामध्ये आंब्याचा रस एकत्र करा. जेव्हा मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल, त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर, अक्रोड आणि बदाम-पिस्त्याचे तुकडे एकत्र करा. मिश्रण एकजीव करून गॅसवरून उतरवून थंड करा. तयार मिश्रणाचे पेढे तयार करा. त्यानंतर अक्रोड, बदाम आणि पिस्ता घालून सर्व्ह करा.
मँगो सकोरा कुल्फी
साहित्य :
आंब्याचे तुकडे, आंब्याचा गर, दूध, साखर, कॉर्नफ्लॉअर, मध, ड्रायफ्रुट्स, पेठा किंवा चेरी 2 ते 3 तुकडे.
कृती :
दूध मंद आचेवर आटवून घ्या. एका बाउलमध्ये एक मोठा चमचा थंड दूध आणि कॉरनफ्लॉवर एकत्र करून पेस्ट तयार करा. जेव्हा दूध आटून अर्धं होईल त्यावेळी त्यामध्ये कॉर्नफ्लॉअरची पेस्ट टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. जेव्हा हे थोडं थंड होईल तेव्हा यामध्ये साखर एकत्र करा. यामध्ये आंब्याचा गर, मध आणि आंब्याचे काही तुकडे एकत्र करा. तयार मिश्रण एका बाउलमध्ये भरून फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा हे फ्रिज होईल त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे एकत्र करा.
(Image Credit : The Golf Lounge)
मँगो स्नो
साहित्य :
आंब्याचा गर - 200 ग्रॅमपाणी - 1 लीटरपिठी साखर - 200 ग्रॅम
कृती :
सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून गाळून घ्या. मिश्रण एखाद्या पसरट भांड्यामध्ये फ्रिजरमध्ये ठेवा. एका तासानंतर भांड काढा आणि मिश्रण एकत्र करून घ्या. असं 6 ते 7 वेळा करा. त्यानंतर मिश्रण स्नोप्रमाणे दिसू लागेल. तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढा आणि सर्व्ह करा.
मँगो बदाम कुल्फी
साहित्य :
फुल क्रिम दूध - 1 लीटर, मावा - 100 ग्रॅम, आंब्याचा गर, पिठी साखर - 100 ग्रॅम, बदामाचे तुकडे, वेलची पूड.
कृती :
एखाद्या भांड्यामध्ये दूध उकळून घ्या. दूध तोपर्यंत गरम करा जोपर्यंत उकळून अर्धं होत नाही. त्यानंतर यामध्ये पिठी साखर एकत्र करून थंड करत ठेवा. त्यानंतर हे मिक्सर जारमध्ये घेऊन त्यावर आंब्याचा गर, बारिक कापलेले बदाम, मावा आणि वेलची पूड व्यवस्थित एकत्र करा. तयार मिश्रण कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून 7 ते 8 तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. फ्रिज झाल्यानंतर मोल्डमधून काढून थंडगार कुल्फीचा आस्वाद घ्या.
मँगो खीर
साहित्य :
आंब्याचा गर, फुल क्रीम दूध, कंडेस्ड मिल्क, तांदूळ, पिठी साखर, ड्रायफ्रुट्स
कृती :
दूध आणि तांदूळ एका भांड्यामध्ये एकत्र ठेवा. मंद आचेवर आटवून घ्या. कंडेंस्ड मिल्क आणि पिठी साखर एकत्र करा. गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या. यामध्ये आंब्याचा गर एकत्र करा. कापलेला पिस्ता आणि बदामाचे तुकडे घालून सर्व्ह करा.