मुंबई : आपल्यापैकी काही जण खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. मांसाहारींना तर तसंही खाण्यात बरेच पर्याय असतात पण त्याचसोबत फक्त शाकाहारी असणारे अनेक जणसुघ्दा स्वत:ला 'फुडी' (Foodie) म्हणवतात. मग त्यांना जरी कमी पर्याय उपलब्ध असले तरी ते सगळे त्यांनी खाऊन पाहिलेले असतात. अशा सर्व शाकाहारींसाठी आम्ही देतोय या काही हॉटेल्स आणि थालींची लिस्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या या १५ थाळी आम्ही शोधून आणल्यात फक्त तुमच्यासाठी. याठिकाणांवर एकदा नक्की जा आणि थाळी चाखून पाहा.
1. महाराजा भोग
महाराजा भोग या शाकाहारी हॅाटेलमध्ये विविध प्रकारच्या पदार्थ्यांच्या थाळीचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. गुजराती व राजस्थानी थाळी हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थीम्सनुसार थाळीचे प्रकार येथे उपलब्ध केले जातात. मात्र, महाराजा भोगमधील जैन थाळीला खवय्यांची सर्वाधिक पसंती मिळालेली आहे. मुंबईत बऱ्याच ठिकाणी या हॉटेलच्या शाखा आहेत.
2. गिगांतिक दारा सिंग थाळी
पवई आणि ठाणे अशा दोन ठिकाणी असलेले गिगांतिक दारा सिंग थाळी हे मोठे असे हॉटेल आहे. येथील एका थाळीमध्ये चटपटीत पाणीपुरीसहीत तब्बल 36 निरनिराळ्या पदार्थांची चव चाखता येते. गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम, मुगाच्या डाळीचा हलवा, रबडी व मालपोहा या पदार्थांना ग्राहकांकडून सर्वांधिक मागणी आहे.
3. देसी क्लब
मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेले हे हॉटेल चॉकलेट थाळीसाठी प्रसिद्ध आहे. या थाळीमध्ये चॅाकलेट ब्राऊनी, चॅाकलेट ट्रफल यांसारखे चविष्ठ पदार्थांचा समावेश असलेल्या थाळींचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय, थाळीमध्ये 3 ते 4 प्रकारचे चॅाकलेट डेझर्ट्सदेखील असतात.
4. श्री ठाकर भोजनालय
दक्षिण मुंबईतील काळबादेवीमध्ये असणारं हे हॅाटेल पारंपरिक गुजराती पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या थाळीत 2 ते 3 फरसाणचे पदार्थ, 2 प्रकारच्या भाज्या, 2 प्रकारच्या डाळी, मेथी पुरी, दही, छास, भात, खिचडी आणि 4 वेगवेगळ्या मिठाई अशी लज्जतदार थाळीची चव आपल्याला येते चाखायला मिळेल. खवय्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे येथील पदार्थ आपण अमर्यादित खाऊ शकता.
5. श्री कृष्ण बोर्डिंग हाऊस
दक्षिण भारतीय पदार्थ प्रचंड आवडत असतील तर मग तुम्ही माटुंगा स्टेशनच्या पश्चिमेला अगदी लागूनच असलेल्या श्री कृष्ण बोर्डिंग हाऊस हॅाटेलला नक्कीच भेट द्या. पांरपरिक पद्धतीच्या दक्षिण भारतीय पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. येथेही किती प्रमाणात तुम्ही पदार्थ खाऊ शकतात. शिवाय, सजावटीसहीत केळीच्या पानावर तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येतो.
6. भगत ताराचंद
भगत ताराचंद हॅाटेलमध्ये पंजाबी पदार्थांची थाळी मिळते. महत्त्वाचे म्हणजे ही थाळी अगदी तुमच्या खिशाला परवडणारी अशी आहे. यात विविध खमंग पंजाबी पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर येथे मिळणारे छास तर तुम्ही चुकवूच नका. या छासचे खवय्ये दिवाने आहेत.
7. पंचवटी गौरव
मुंबईतील लोअर परळ इथे प्रसिद्ध असलेल्या या हॅाटेलमध्ये ठराविक थाळींचेच प्रकार मिळतात व प्रत्येक थाळीसोबत राजस्थानी व गुजराती थाळींचं मिश्रण करून दिले जाते.
8. बोहेमिआन ब्रू
मुंबईतील प्रसिद्ध अशा बोहेमिआन ब्रू हॅाटेलामध्ये युरोपिअन पदार्थांमधील थाळींचा आस्वाद घेता येईल. सौतीड व्हेजिटेबल, 2 गार्लिक ब्रेड, फ्रेन्च फ्राईस, पास्ता, रोसेटो, चॅाकलेट ब्राऊनी या 6 पदार्थांचा समावेश प्रत्येक थाळीत असतोच. मुंबईतील कॅान्टीनेंटल थाळी बनवणारं हे एकमेव हॅाटेल आहे.
9. पंचम पुरीवाला
मुंबईतील सर्वात जुने, सी.एस.टी स्टेशनला अगदी लागूनच असलेल्या या हॉटेलमध्ये चवदार शाकाहारी थाळी मिळते. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, 4 प्रकारच्या पुऱ्या व व्हेज पुलाव. उन्हाळ्यात मिळणारी आमरस पुरी तर खूपच प्रसिद्ध आहे.
10. सम्राट हॅाटेल
गुजराती थाळीसाठी प्रसिद्ध असणा-या चर्चगेट स्टेशनजवळील सम्राट हॅाटेल हे तेथील मिळणाऱ्या सोयी व सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. या हॅाटेलची खासियत थाळीचा आस्वाद घेत असताना येथील आल्हाददायक वातावरण म्हणजे काही औरच मजा असते.
11. टिप टॅाप बुफे
टिप टॅाप बुफे हे हॅाटेल ठाण्यातील प्रसिद्ध असे हॉटेल आहे. शाकाहारी थाळींसाठी प्रसिद्ध असलेलं या हॅाटेलमध्ये प्रत्येक दिवशी थाळीतील पदार्थ बदलतात. आमरसासाठी येथे खवय्यांची प्रचंड गर्दी असते.
12. चेतना हॅाटेल
मुंबईतील फोर्टजवळ असलेलं गुजराती व राजस्थानी थाळींसाठी चेतना हॅाटेल प्रसिद्ध आहे. इथेही तुम्ही कोणतेही पदार्थ कितीही प्रमाणात खाऊ शकता. एकूण खाण्यावर कोणतेही बंधन नाही, हे उत्तमच. भारतीय पदार्थांची चव चाखायची असेल तर या हॅाटेलला नक्की भेट द्या.
13. हॅाटेल राजधानी
हॉटेल राजधानीमध्ये सर्व प्रकारांतील भारतीय चवीच्या थाळींचे प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या थाळीचं वैशिष्ट म्हणजे यात 2 प्रकारच्या चटण्या ( हिरवी व लाल), लोणचे, गाजराची कोशिंबीर, तिखट पापड, गोड चटणी, चाट, तब्बल 8 प्रकारच्या डाळी, पुरी, रोटी, ठेपले व स्वीट डिश म्हणून मिठाई व मालपोहा यांची मेजवानीच येथे असते.
14.स्टेटस शाकाहारी हॅाटेल
मुंबईच्या नरिमन पॅाईंट इथे असलेलं हे हॅाटेल थाळींच्या विविध प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. दुपारच्या जेवणासाठी मिळणा-या थाळीसाठी येथे खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते.
15. गोल्डन स्टार थाळी
या हॅाटेलच्या नावावरूनच इथे असलेल्या थाळींची चव कळते. राजस्थानी व गुजराती अशा दोन प्रकारच्या थाळींचं एकत्रित मिश्रण करून खवय्यांना एक वेगळ्याच थाळीचा आस्वाद घेता येतो. यामुळे जर गुजराती व राजस्थानी पदार्थांची चव चाखण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाहीय. एकाच वेळी गुजराती-राजस्थानी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास गोल्डन स्टार थाळीला नक्की भेट द्या.