पुणे : कमीत कमी तेलकट पण तरी चटपटीत खाण्याचा मोह सगळ्यांनाच पावसाळ्यात होतो. मग उशीर न करता तुम्ही करू शकता व्हेज मोमोची रेसिपी. झटपट वेगळ्या चवीची ही रेसिपी या विकेंडला नक्की ट्राय करा.
साहित्य :
कोबी अर्धी वाटी
गाजर अर्धी वाटी
ढोबळी मिरची अर्धी वाटी
लसूण ७ ते ८ पाकळ्या
आले अर्धा इंच
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मैदा दोन वाट्या
चवीनुसार मीठ
मिरेपूड
सोससॉस
तेल
कृती :
गरम पाण्यात एक चमचा तेल आणि मीठ टाकावे. ते पाणी मैद्यात टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ छान मळून अर्धा तास झाकून ठेवावे.
आतील सारण करताना तेलात बारीक चिरलेल्या दोन मिरच्या, पातळ कापलेला लसूण, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, कोबी टाकून परतावे. त्यात मीठ, दोन चमचे सोया सॉस, मिरपूड टाकून भाज्या कोरड्या होईपर्यंत परताव्यात.
मैद्याच्या पिठाचे छोटेसे गोळे करून ते मध्यम पातळ लाटावेत. त्यावर एक चमचा तयार सारण टाकावे. आता लाटलेल्या पारीची एकावर एक घडी घालून दुमडा.असे पुरेसे मोमो तयार झाल्यावर इडली पात्राला तेलाचा हात फिरवून ते १२ मिनिटे वाफवून घ्या.गरमागरम मोमो शेजवान सॉस किंवा मेयॉनीजसोबत सर्व्ह करा.
(टीप :उकडताना मोमो फाटत असतील तर मैदा एकसारखा मळून गोळा करावा.)