सारिका पूरकर-गुजराथीमुलांना सुट्टी लागल्यामुळे घराघरांमध्ये नुसता दंगा मस्ती आणि कल्लोळ असेल. दर तासा दोन तासांनी आई आम्हाला अमुक हवं अशा फर्माइशी असतील. जे हवं ते यम्मी आणि चटपटीतच असायला हवं हा सर्वच मुलांचा हट्ट. आता मुलांना चटपटीत आवडतं म्हणून त्यांना सारखी बाहेरची पाणीपुरी, भेळपुरी, पॅटिस देवून कसं चालेल. पण खरंतर मुलांना अतिशय आवडणाऱ्या पाणीपुरीला हेल्थी टच देवून पाणीपुरीची मुलांची हौस घरच्याघरी भागवता येते.
* फ्रूटी पाणीपुरीसध्या बाजारात कलिंगड, संत्री द्राक्षं अन डाळिंबं भरपूर आली आहेत. एका भांडयात थोडा कलिंगडाचा, संत्र्याचा आणि द्राक्षांचा ज्यूस घ्या. त्यात थोडी साखर, काळेमीठ, मिरीपावडर, चाट मसाला, पाणीपुरी मसाला अन कोथिंबीर घाला. ते थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर पाणीपुरीच्या पुरीत हे फळांचं पाणी भरा. त्यात चण्यांऐवजी डाळिंबाचे दाणे घाला. वरुन बारीक शेव भुरभुरा. सफरचंदाच्या, आंब्याच्या फोडीही तुम्ही घालू शकता. एकदम हेल्दी फ्रूट पाणीपुरी तय्यार. एरवी फ्रूट्स म्हटले की मुलं नाकं मुरडतात. फ्रूटी पाणीपुरी हा त्यावरचा रामबाण उपाय आहे.
* प्रोटिन पाणीपुरी
सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्यांमध्ये प्रोटिन्स भरपूर असतात. त्यामुळे या डाळी शिजवल्यानंतर त्यांचं पाणी, चाट मसाला, पाणीपुरी मसाला,जिर-मिरे घालूनही पाणीपुरी बनवता येईल. पुरीमध्ये मोड आलेली कडधान्यं आणि नंतर हे पाणी घालून झकास प्रोटीन पाणीपुरी बनेल. कडधान्यांचं पाणीही पाणीपुरीसाठी वापरता येतं.
* बटरमिल्क पाणीपुरी सध्या ऊन मी मी म्हणतय. ताक हे तर उन्हाळ्यात अमृतासमान असतं. याच ताकाचा वापर पाणीपुरीसाठी करता येईल. ताकात जिरे, काळं मीठ, पुदिना, कोथिंबीर, थोडंसं आलं घालून पातळसर मिश्रण बनवा. ते गार करा. पुरीत भरताना खारी बुंदी आणि ताकाचं मिश्रण घाला.ही पाणीपुरीही एकदम बेस्ट लागते.* आंबटगोड पाणीपुरी आंब्याची झाडं कैऱ्यांनी लगडलेली दिसताहेत सध्या. घरोघरी कैरीचं पन्हं, कैरी डाळ याचा बेत असतोच. याच पन्ह्याचा उपयोग पाणीपुरीसाठीही करता येतो. पन्ह्यात भाजलेल्या जिऱ्या-मिऱ्याची पावडर अन कोथिंबीर मात्र अवश्य घालावी. पन्ह्यासाठी शक्यतो गूळ वापरा. उन्हाळ्यात गूळ किती गुणकारी आहे, हे माहितच आहे ना ! कैरीप्रमाणेच चिंचेचं पन्हंही पाणीपुरीसाठी वापरु शकता.* गार्लिक पाणीपुरीपाणीपुरीलाही थोडा मसाल्याचा तडका हवाच ना! त्यासाठी लसणाच्या पाच-सात पाकळ्या, लाल तिखट, काळं मीठ, पाव चमचा सायट्रिक अॅसिड, चवीनुसार साखर एकत्र घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करावी. यात भरपूर थंडगार पाणी मिसळून ते पाणी पुरीत घालून खाता येतं. ही पाणीपुरीही टेस्टी लागते.