वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जेव्हा कधी मित्रांसोबत गेलात तर मांसाहारी लोक मस्त जेवणावर ताव मारतात. पण शाकाहारी लोकांना पनीर किंवा इतर काही पदार्थांवर भागवावं लागतं. अशात आता शाहाकारी लोकांसाठी बाजारात 'व्हेज चिकन' आणलं आहे. 'केएफसी' ने अमेरिकेतील एका आउटलेटमध्ये 'व्हेज चिकन' उपलब्ध करून दिलं आहे. म्हणजे केएफसी शाकाहारी लोकांसाठी एक दिवस हे व्हेज चिकन उपलब्ध करून देणार आहे. आणि हे जाणून घेणार आहेत की, लोकांना हे आवडलं की नाही. पण हे व्हेज चिकन नेमकं असतं काय?
कशापासून तयार होतं व्हेज चिकन?
केएफसी आता शाकाहारी लोकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. बाजारात आधीच काही कंपन्यांकडून व्हेज चिकन लोकांना दिलं जातं. त्यातीलच एक कंपनी म्हणजे 'वेजले फूड्स'. या कंपनीनुसार, 'व्हेज चिकन' प्रोटीनने भरपूर असतं. तसेच यात फॅटचं प्रमाणही कमी असतं. हे 'व्हेज चिकन' सोयाबीनपासून तयार केलं जातं. जे दिसायला आणि टेस्टला चिकनसारखंच असतं.
सोयाबीनमध्ये ३३ टक्के प्रोटीन, २२ टक्के फॅट, २१ टक्के कार्बोहायड्रेट आणि १२ टक्के मीठ असतं. तसेच सोयाबीनमध्ये लिनोलिक आम्ल आणि लिनालेनिक आम्ल भरपूर असतं. जे शरीरासाठी आवश्यक मानलं जातं. त्यासोबतच सोयाबीनमध्ये आयसोफ्लावोन, लेसिथिन आणि फायटोस्टेरॉल असेही आरोग्यदायी तत्त्व असतात.