सारिका पूरकर-गुजराथीनवीन वर्षाचं सेलिब्रेशन आटोपलं. पण खवय्यांसाठी सेलिब्रेशन हे वर्षभर सुरूच असतं. काही ना काही निमित्त हवं बस.. मग खाण्या-पिण्याची नुसती चंगळ असते. या नवीन वर्षात बरंच काही नवीन दिसणार आहे. टेक्नॉलॉजी, फॅशन या क्षेत्रात तर ट्रेण्ड बदलतच असतात. मात्र, फूड इंडस्ट्रीतही वर्ष बदललं की ट्रेण्ड बदलतात. 2018 या वर्षासाठी ही फूड इंडस्ट्री काही ट्रेण्ड सेट करु पाहतेय. पदार्थाचे रंग, त्यातील घटक पदार्थ , त्यातील पौष्टिकता, चव याबाबी लक्षात घेऊनच हे ट्रेण्ड सेट होताहेत. नामांकित शेफ आणि खाद्य संस्कृती अभ्यासकांच्या मते या वर्षात इंडियन फूड हे ग्लोबल फूड म्हणून नावारूपास येणार आहे. या वर्षात भारतीय खाद्य संस्कृती सेंद्रिय आणि नैसर्गिक घटकपदार्थांवर भर देणार असून अनेक नवीन गोष्टी भारतीय खाद्यपदार्थात दिसणार आहेयंदाच्या वर्षातलं खाणं-पिणं
* भाज्यांची मुळं आणि काड्यांचा वापर
या वर्षात किचनमधील वेस्टेज कमीत कमी प्रमाणात काढण्यावर प्रमुख भर असेल. मुळा, गाजर, नवलकोल, रताळे तसेच पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची मुळं आणि काड्या यांचा वापरही पदार्थांमध्ये कल्पकतेनं करण्याचा विचार सर्वत्र होतोय. कारण या मुळांमध्ये आणि काड्यांमध्येच जीवनसत्वं आणि पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. सूप, चटणी, कोरडी भाजी, मॅरिनेशन, रस्सा या स्वरु पात हा वापर होऊ शकतो.
* प्रथिनयुक्त घटक पदार्थांवर भर
भारतीय खाद्य परंपरेत नेहमीच प्रथिनं भरपूर प्रमाणात आढळतात. कारण विविध प्रकारच्या डाळी, कडधान्यं यांचा वापर त्यात होतो. या वर्षातही डाळी, कडधान्य यांच्या स्वरूपात जेवणातील प्रथिनांचं प्रमाण कसं वाढवता येईल हे पाहिलं जाणार आहेच परंतु, त्याचबरोबर काही पालेभाज्या आणि फळ भाज्यांचाही प्रथिनांच्या दृष्टीनं विचार करून उपयोग करण्यावर भर असणार आहे. त्यामुळे शाकाहाराचा प्रसार करण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
2018 या वर्षात मशरु म हा सर्वच प्रकारच्या खाद्य परंपरेत हिरो ठरण्याची शक्यता आहे. कारण केवळ भाज्या, पराठे, सॅलेड यातच नाही तर सूप व्यतिरिक्त अन्य पेयांमध्येही मशरूमचा सढळ हातानं वापर करण्याचा विचार होतोय. स्किनी मोचा फ्रॅप पासून तर मशरु म कॉफी असे भन्नाट प्रयोग मशरु मचा वापर करु न होऊ शकतात.
* लोकल फूडची चलती
यंदाच्या वर्षात 5 स्टार हॉटेलपासून तर गल्लीतील रेस्टॉरण्टमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध विविध प्रकारच्या भाज्या, धान्यं यांचा वापर करून नवनवीन पाककृती सादर करण्याचा नवा ट्रेण्ड सेट होऊ पाहतोय. कारण भारतभरात लाखो स्थानिक बाजारपेठा असून प्रत्येक ठिकाणी नवनवीन पिकं घेतली जातात. चव आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त पण तरीही दुर्लक्षित या घटकांना आता प्राधान्य देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कर्टुले ही रानभाजी, राजस्थानमधील केरसांग्री, पंजाबमधील सरसो या लोकल फूडला आता आणखी चांगले दिवस येणार आहेत.
* फूड टेकची क्रेझ
सध्या मोबाईल, इंटरनेट, टीव्हीवर कुकरी शो, कुकिंग अॅप व्हिडिओज सहज उपलब्ध झाल्यामुळे जगभरातील पाककृतींचा खजिना उपलब्ध झाला आहे. क्लास न लावता घरीच हे पदार्थ सहज तयार करता येऊ लागले आहेत. या वर्षात तंत्रज्ञानाच्या जगातील पुढचे पाऊल असणार आहे ते म्हणजे रेसिपी किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. आजवर क्र ाफ्ट किट, स्पोर्ट्स किट आपण पाहिले आहेत. आता मात्र रेसिपी किटमुळे गृहिणींचा स्वयंपाकघरातील वेळ खूपच वाचणार आहे.
* एडिबल फुलं
खाण्यायुक्त फुलांचा वापर करण्याचा ट्रेण्ड खरंतर 2016 मध्येच आलाय. परंतु त्याचा अधिक मोठ्या प्रमाणावर वापर 2018 मध्ये होवू शकतो. विविध पेयं मिठाया यामध्ये कृत्रिम सुगंधाऐवजी नैसर्गिक ताज्या फुलांचा वापर अधिक प्रमाणात होणार आहे.* टॉनिक वॉटर येणार!
थंडगार, सोडा घातलेली थंडं पेयं पिऊन आरोग्याचं नुकसान करण्याऐवजी टॉनिक वॉटर ही नवीन संकल्पना रूजवण्यावर नामांकित शेफ प्रयत्न करताहेत. नॉन अल्कोहोलिक, उत्तम चव तसेच नैसर्गिक घटकांचा वापर करून केलेले हे टॉनिक वॉटर यंदाच्या वर्षी लोकप्रिय होणार आहे.