आपल्या आहारात दही किंवा ताकाचा समावेश करण्याचा सल्ला अनेक लोक देतात. पण जेव्हा आरोग्यासाठीच्या फायद्यांबाबत चर्चा येते. त्यावेळी अनेक लोक ताकाला पसंती देतात. अनेक लोक असंही सांगतात की, पावसाळ्यामध्ये दह्याऐवजी ताकाचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, ताक दह्यामध्ये पाणी एकत्र करून तयार केलं जातं. मग हे दह्यापेक्षाही जास्त फायदेशीर कसं ठरतं?
ताक का ठरतं अधिक फायदेशीर?
जेव्हा दही घुसळून त्याचं ताक तयार केलं जातं. त्यावेळी त्यांच रूप पूर्णपणे बदलतं. ताक पचण्यास अत्यंत हलकं असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हे मदत करतं. त्यामुळे दह्याऐवजी ताक फायदेशीर ठरतं.
ताकाचे फायदे :
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी ताक मदत करतं. तसेच मसालेदार पदार्थांच्या सेवनानंतर ताक पोटाला आराम देण्याचं काम करतो. हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत असून ज्यांना लॅक्टोज पचवणं शक्य नसतं, अशा व्यक्तीही ताकाचं सेवन करू शकतात. ताक व्हिटॅमिन्सचाही उत्तम स्त्रोत म्हणून ओळखलं जातं.
ताकाचे आणखी फायदे...
एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, ताकामध्ये बायोअॅक्टिव प्रोटीन असतं. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच आणखी एका संसोधनानुसार, ताक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं.
यावेळी करावं ताकाऐवजी दह्याचं सेवन?
ताक अत्यंत फायदेशीर आहे. परंतु, काही परिस्थितींमध्ये ताकाऐवजी दह्याचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं असेल किंवा ज्या मुलांमध्ये पोषणाची कमतरता असेल त्यांनी ताकाचं सेवन न करता दह्याचं सेवन करावं. कारण दह्यामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण अधिक असतं. ज्या व्यक्तींना डॉक्टरांनी लिक्विड डाएट घेण्यास मनाई केली असेल उदाहरणार्थ किडनीच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्ती. त्यांनी दह्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)