सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कधी कोणती गोष्ट ट्रेन्डमध्ये येईल, याचा काही नेम नाही. वेळोवेळी फूड वर्ल्डमध्ये अनेक गोष्टी ट्रेन्ड करताना दिसून येतात. वेगवेगळे, भन्नाट पदार्थ खवय्यांसाठी इन्ट्रोड्यूस करण्यात येतात. सध्या अशाच एका भन्नाट पदार्थाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. या पदार्थाचं नाव आहे 'कॉकरोच मिल्क'. आपण गायीचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध ऐकलं आहे. पण कॉकरोज मिल्क म्हणजे चक्क झुरळाचं दूध...? ऐकूनच विचित्र वाटत असेल ना? आणि किळसही वाटली असेल. आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल की 'झुरळंही दूध देऊ लागली की काय?', तर तसं अजिबात नाहीय. याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया. कॉकरोच मिल्क शरीरासाठी एखाद्या सुपरफूडप्रमाणे काम करतं. याचे शरीराला अनेक फायदेही होतात, ही बाब एका रिसर्चद्वारे सिद्ध झाली आहे.
संशोधनानुसार, झुरळांच्या शरीरामध्ये मिल्क क्रिस्टल्स आढळून येतात. खरं तर हे बेबी कॉकरोचचं खाद्य असतं. या मिल्क क्रिस्टल्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. पण आता तुम्ही विचार कराल की, बेबी कॉकरोचच्या खाद्याचा आपल्या शरीराला काय उपयोग? इंटरनॅशनल यूनियन ऑफ क्रिस्टलोग्राफीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, मिल्क क्रिस्टल्स माणसांसाठीही फायदेशीर ठरतात. या मिल्क क्रिस्टल्समध्ये प्रोटीन्स, फॅट्स, साखर आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण मुबलक आहे.
1000 कॉकरोचपासून मिळतं 100 ग्रॅम दूध
वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंगळुरूचे बायोकेमिस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले की, लोक या दुधाचा आरोग्याच्या दृष्टीनं वापर करतील की नाही, हे माहीत नाही. पण तरीही आम्ही हे दूध तयार करत आहोत. कारण याचे फायदे भरपूर आहेत. अन्य रिपोर्टनुसार, कॉकरोच मिल्क तयार करणं फार सोपंही नाही. 1000 झुरळांपासून 100 ग्रॅम दूध बनवलं जाते. काही दिवसांनी कॉकरोज मिल्कच्या औषधी गोळ्याही तयार करण्यात येणार आहेत. वैज्ञानिकांनी यावर काम करण्यास सुरुवातही केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
भारतीय कंपनीने लावला होता शोध
एका विशिष्ट प्रकारच्या झुरळापासून दूध तयार केले तर मनुष्यप्राण्यासाठी ते फायदेशीर ठरेल, असा शोध भारतीय संस्था इंस्टीट्यूट फॉर स्टेम सेल बॉयोलॉजी अॅन्ड रिजेनरेटिव मेडिसननं लावला होता. 2016 मध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.
असं तयार झालं कॉकरोच मिल्क
अॅन्टोमिल्क कॉकरोच मिल्कनंतर दोन वर्षांनी बाजारामध्ये आले. कॉकरोच मिल्क डिप्लोपटेरा पुक्टाटापासून तयार करण्यात येतं. हवाई बेटावर आढळून येणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या झुरळापासून हे दूध तयार करण्यात येतं. हे झुरळ अंडी देण्याऐवजी लहान मुलांना जन्म देते. या झुरळामध्ये आढळून येणाऱ्या मिल्क क्रिस्टल्सपासून हे दूध तयार करण्यात येतं.
आपण हे दूध खरेदी करू शकतो का?
दक्षिण आफ्रिकेतील एक कंपनी गुर्मे ग्रबने कीटकांपासून दूध तयार करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये फक्त झुरळच नाही तर इतरही अनेक कीटकांपासून दूध तयार करण्यात येते. त्यांनी असं सांगितलं आहे की, या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. हे लॅक्टोज फ्री असतात. चवीलाही चांगले असण्यासोबत गायीच्या दुधापेक्षाही मानवी शरीराला जास्त फायदेशीर ठरतात.
...म्हणून हे दूध सुपरफूड ठरत नाही
काही वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून झुरळाचे दूध आरोग्यदायी असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच या दूधातून मानवी शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात असं सांगण्यात आले होते. या सर्व गोष्टी तंतोतंत खऱ्या असल्या तरिही मानवाने चांगल्या आरोग्यासाठी अशा पदार्थांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक आणि वनस्पतींशी निगडीत पदार्थांचा आहारत समावेश करणं फायदेशीर ठरेल.