आरोग्य चांगलं राखण्यामागे आपण सेवन करत असलेल्या आहाराचा फार मोठा वाटा असतो. पौष्टीक आहाराअभावी अनेक लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं. आपण अनेकदा पौष्टिक पदार्थ म्हटलं की त्यामध्ये दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांबाबत अनेकदा ऐकतो. आपण बऱ्याचदा दही आणि पनीरचा प्रामुख्याने आहारात समावेश करतो. परंतु तुम्हाला याचे आरोग्यवर्धक फायदे माहीत आहेत का? जाणून घेऊयात याच्या फायद्यांबाबत...
आठवड्यातून एक दिवस याचं सेवन करण्यामागे अनेक कारणं आहेत. दही आणि पनीर अत्यंत पौष्टिक पदार्थ आहेत. यांमध्ये आढळणारी पौष्टिक तत्व त्वचेसाठी आणि पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात या पदार्थांचं सेवन आठवड्यातून कितीवेळा करावं त्याबाबत...
दही
दही चांगल्या बॅक्टेरियाचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. केस आणि त्वचा सुंदर बनवण्यासाठी त्याचप्रमाणे पोटाचे आजार म्हणजेच डायरिया, बद्धकोष्ट आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. दही आतड्यांसाठी गुणकारी ठरते. याचे सेवन मीठ किंवा साखरेशिवाय करा. यामध्ये व्हिटॅमिन-डी, प्रोटीन आणि व्हिटॅमिन-बी12 मुबलक प्रमाणात असतं.
पनीर
दह्याप्रमाणेच पनीर खाण्याचेही अनेक फायदे आहेत. हे आंबवलेल्या पदार्थांपैकी आरोग्यासाठी फायदेशीर आणि चविष्ट पदार्थ आहे. यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतं. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन-डी आहे. ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून दोन वेळा पनीरचा आहारामध्ये समावेश करावा.