हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक सीझनल भाज्यांची आवाक वाढते. त्यातीलच एक भाजी म्हणजे, फ्लॉवरची भाजी. त्यामुळे अनेकदा फ्लॉवरचा समावेश असणाऱ्या किंवा स्पेशली फ्लॉवरचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या भाज्या घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. तसेच हॉटेलमध्ये गेल्यावरही अनेकदा याच भाज्या मागवण्यात येतात. पण या सर्व पदार्थांपेक्षा वेगळा एक पदार्थ तुम्ही तयार करू शकता. तुम्ही तंदूरी डिशेबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही कधी तंदूरी गोभी ऐकलयं का? तंदूरमध्ये तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चवच हटके असते. मग तो कोणत्याही पदार्थ असो. रोजरोजच्याच भाजीला कंटाळला असाल तर तंदूरी गोभी तुम्ही ट्राय करू शकता. फ्लॉवरला तंदूरी मसाल्यासोबत फ्राय करून तयार करण्यात आलेला हा पदार्थ खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतो.
साहित्य :
- फ्लॉवर
- दही 2 मोठ चमचे
- लसणाची पेस्ट 2 मोठे चमचे
- आल्याची पेस्ट 2 मोठे चमचे
- खडा मसाला
- हळद
- मिरची पावडर
- कसूरी मेथी 1 चमचा
- लिंबाचा रस अर्धा चमचा
- लिंबू 1
- कांदे 2
कृती :
- सर्वात आधी हळद आणि लाल मिरची पावडर व्यतिरिक्त खडा मसाला मिक्सरमधून बारिक करून घ्या.
- एका बाउलमध्ये हळद आणि लाल मिरची पावडर एकत्र करून घ्या.
- आता यामध्ये लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यामध्ये दही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा.
- आता फ्लॉवरचे छोटे तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर तयार केलेली पेस्ट फ्लॉवरला व्यवस्थित लावा.
- अर्धा ते एक तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवा. ज्यामुळे सर्व मसाले फ्लॉवरला व्यवस्थित लागतील.
- गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मीठाचा एक जाडसर थर पसरवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक जाळीदार स्टॅड ठेवा.
- एक मिनटासाठी मध्यम आचेवर गरम करा
- त्यानंतर फ्रिजरमध्ये ठेवलेलं फ्लॉवर बाहेर काढून ते तुकडे स्टॅडवर ठेवून वर झाकण ठेवा.
- थोड्या वेळाने पाहा की फ्लॉवर शिजला आहे की, नाही.
- जर कच्चे वाटले तर चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- गरमा गरम तंदूरी गोभी खाण्यासाठी तयार आहे.
- तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा शेजवान सॉससोबत सर्व्ह करू शकता.