चॉकलेट म्हटलं की, लहानांपासून ते मोठयांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ... जगात क्वचितच चॉकलेट न आवडणारे लोक सापडतील. याच चॉकलेट प्रेमींसाठी एक खास बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. सध्या एका चॉकलेटची फारच चर्चा रंगली आहे. पण ही चर्चा त्या चॉकलेटच्या चवीची नाहीतर चॉकलेटच्या किंमतीची आहे. तुम्हीही या चॉकलेटची किंमत वाचून नक्कीच हैराण व्हाल...
सहा लाखाचं चॉकलेट
सध्या चॉकलेट प्रेमींसाठी पोर्तुगालमध्ये इंटरनॅशनल चॉकलेट फेस्टिवल सुरु आहे. या फेस्टिवलमध्ये जगभरातील चॉकलेट विकले जात आहेत. इथे इतक्या प्रकारचे चॉकलेट आहेत की त्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. याच हजारो चॉकलेटमध्ये हे एक चॉकलेट जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या चॉकलेटची किंमत चक्क ६ लाख रुपये इतकी आहे. या फेस्टिवलमध्ये हे चॉकलेट विकलं जात असून हे जगातलं सर्वात महाग चॉकलेट असल्याचही बोललं जात आहे.
२३ कॅरेट गोल्ड प्लेटेडपासून बनलेलं चॉकलेट
मीडिया रिपोर्टनुसार, या इंटरनॅशनल चॉकलेट फेस्टिवलमध्ये ७७२८ युरो म्हणजे ६ लाख रुपयांना हे चॉकलेट विकलं जात आहे. हे चॉकलेट इतकं महाग का? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. या चॉकलेटची खासियत म्हणजे यावर २३ कॅरेट गोल्ड प्लेटेड चॉकलेटचा मुलामा देण्यात आला आहे. या चॉकलेटचं नाव 'ग्लोरिअस' असं ठेवण्यात आलंय. त्यासोबतच या चॉकलेटवर केसरचाही मुलामा दिला आहे.
केवळ इतकेच चॉकलेट तयार
या चॉकलेटचा आस्वाद मात्र काही मोजकेच लोक घेऊ शकणार आहेत. कारण या चॉकलेटची किंमत जास्त असल्याने हे केवळ एक हजारच चॉकलेट तयार करण्यात आले आहेत. हे चॉकलेट तयार करण्यासाठी डॅनियल गोम्स गेल्या एक वर्षांपासून मेहनत करत होते. या चॉकलेटची पॅकेजींगही खास करण्यात आली आहे. लाकडाच्या बेसवर सोन्याने सिरीअल नंबर लिहिले आहेत. तसेच यावर हजारपेक्षा जास्त स्वारोवस्की क्रिस्टल आणि मोती लावण्यात आले आहेत.