-सारिका पूरकर-गुजराथीतो एक जनरेशन नेक्स्टचे प्रतिनिधीत्व करणारा तरुण . संगणक अभियंता. डिजिटल मार्केटिंग सल्लागार म्हणून चांगला जॉब. चांगलं लाईफस्टाईल. सर्व एकदम छान. ..पण तरीही तो अस्वस्थ होता. आपण जे करतोय ते आपल्याला करायचं नाहीये. .जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मानवी जीवन आहे आणि ते असं फक्त नोकरी करण्यात घालवायचं नाही एवढंच त्याला ठाऊक . ही अस्वस्थता मनात बाळगल्यानेच मन नोकरीत रमत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. आणि अचानक एक दिवस घरातील किचनमध्ये पडलेल्या यलो प्लेटनं त्याचं आयुष्य बदलून टाकलं. त्याला एक नवं स्वप्न या यलो प्लेटनं दिलं. तो अक्षरश: नव्यानं या यलो प्लेटच्या प्रेमात पडला आणि आज या यलो प्लेटशिवाय त्याचं आयुष्य तो इमॅजिनही करत नाही. तुम्ही म्हणाल काय भानगड आहे ही?
तर ही गोष्ट आहे एका फूड ब्लॉगरची. दिल्लीतील हिमांशू सेहगल या युवकानं घरात एक दिवस पिवळ्या रंगाची वापरात नसलेली प्लेट पाहिली. खरं तर याच प्लेटमध्ये त्याची आई त्याला जेवण वाढत असे. एकदा त्यानं याच प्लेटवर राजमा-चावल सर्व्ह केलेला फोटो काढला आणि तो अपलोड केला होता. अनेकांनी तो लाईक केला. पण कालांतरानं ही प्लेट अडगळीत जाऊन बसली. अचानक ती त्याच्या नजरेस पडली आणि या प्लेटचा वापर काहीतरी क्रिएटिव्ह प्रकारे करण्याचा त्यानं निर्धार केला. त्यानं ताबडतोब नोकरी सोडली. ती प्लेट घेतली आणि एक कॅमेरा आणि थेट निघाला एका अनोख्या खाद्य भ्रमंतीला.या खाद्यभ्रमंतीचा त्याचा उद्देश आहे भारतातील विविध प्रांतातील अत्यंत रुचकर, काही खास पण वेगळ्या चवीचे पदार्थ टेस्ट करण्याचा आणि इन्स्ट्राग्रामच्या मदतीनं अस्सल खवय्यांपर्यंत पोहोचविण्याचा. भारतीय खाद्यसंस्कृतीत हजारो पदार्थांची विविधता आढळते. प्रत्येक राज्य, प्रत्येक गाव येथे अनेक पदार्थ बनवले जातात. जगभरात ही भारतीय खाद्यसंस्कृती आणखी वेगळ्या प्रकारे कशी पोहोचवता येईल हा देखील विचार या फूडब्लॉगमागे आहे. ‘माय यलो प्लेट’ हे इन्स्ट्राग्रामवर त्यानं सुरु केलेले खाते आहे. या खात्यावर, तो जेथे जेथे भटकतो, त्या त्या भागातील अत्यंत लोकप्रिय, काही पारंपरिक पदार्थ तो त्याच्या यलो प्लेटमध्ये खातो, तेथील निसर्ग आणि त्याची यलो प्लेट यांचा सुंदर मेळ साधत सुंदरसा फोटो काढतो आणि मग या खात्यावर तो पोस्ट करतो. पोस्ट टाकताना मग या भागातील प्रवासाचे, तेथील लोकांशी साधलेल्या संवादाचे अनेक किस्से तो सांगतो. त्याचं म्हणणंच आहे की ‘या प्रवासात मला लोकांना भेटायचं आहे, त्यांच्याशी कनेक्ट व्हायचंय, त्यांचं जगणं अनुभवायचं आहे, या सुंदर आणि चवदार पदार्थांची ही निर्मिती पाहायची आहे. नवे चेहरे, नवे प्रदेश हे सारं पाहायचंय मला या यलो प्लेटच्या माध्यमातून. मुख्य म्हणजे जग जे करते, ते मी करणार नाही, जगाच्या वाटेवर न चालता मला माझी स्वत:ची वाट निर्माण करायची आहे.’
हिमांशूला संपूर्ण भारत पालथा घालायचा आहे, जमलं तर त्याच्या यलो प्लेटला परदेश वारीसुद्धा घडवायची आहे. भारतातील २९ राज्यांमध्ये जाऊन २९ असे पदार्थ की जे भारताच्या लोकसंस्कृतीचे, तेथील प्रादेशिकतेची, अस्सल भारतीय चवीची ओळख आहेत अशा पदार्थांना हूडकून काढायचंय. या अनोख्या प्रवासात त्यानं आत्तापर्यंत बंगळुुरु, आसाम, दिल्ली, मुंबई, हिमाचल प्रदेश, राजस्थान, जयपूर, आग्रा, पुष्कर, ऋषीकेश येथे त्याच्या यलो प्लेटमधून तेथील पदार्थ चाखले आहेत. हे पदार्थ त्या शहरात कुठे मिळतात, हे देखील त्यानं इन्स्ट्राग्रामवर टाकले आहे. वरवर सोप्या दिसणाऱ्या या प्रवासातही अडथळे येतात त्याला. एक तर प्रवास खर्चिक असतो. त्याबद्दल त्याची मात्र कुरकूर नसते.त्यासाठी त्याने मदतीचे आवाहन करीत १.६८ लाख रुपये जमवले आहेत. कमीत कमी ५ लाख रुपये जमवायचे आहेत त्याला. दुसरं म्हणजे त्याच्या यलो प्लेटमध्ये त्या प्रदेशातील पदार्थ आकर्षकपद्धतीनं सजवून ती प्लेट स्वत:च्या डाव्या हातात ठेवतो आणि सभोवतालचा परिसर, निसर्गसौंदर्य, माणसं, हातातील प्लेट, त्यातील पदार्थ याची योग्य सांगड घालत, एक छानसा अॅँगल बघून एका हातान< तो स्वत:च फोटो काढतो. असे २५१ फोटो त्याने आत्तापर्यंत अपलोड केलेय. २०,००० फॉलोअर्स त्याला मिळालेय.
पण घरचे मात्र हिमांशूच्या या यलो प्लेट प्रेमाला वैतागले आहेत. कोण लग्न करणार याच्याशी म्हणून त्यांना प्रश्न पडलाय. अर्थात हिमांशूने ते मनाला लावून घेतलेलं नाही.