मॉस्को: फिफा वर्ल्ड कप 2018 कोण जिंकणार, याचं उत्तर बरोब्बर एका महिन्यानंतर मिळणार आहे. मात्र त्याआधी पुढील महिनाभर जगभरातील शेकडो देशांमधील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. फिफाच्या झळाळत्या चषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कपसाठी रशिया पूर्णपणे सज्ज झाला असून मॉस्कोतील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रशियात पहिल्यांदाच वर्ल्ड कप होत आहे. मात्र तरीही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एकही फोटो किंवा बॅनर मॉस्कोमध्ये लावण्यात आलेला नाही. या वर्ल्ड कपसाठी रशियन लोक उत्तम इंग्रजी भाषा शिकले आहेत. फिफा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून ही संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.