युएफा चॅम्पियन्स लीग : रोनाल्डो-मेस्सी जेतेपदासाठी भिडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 5:46 PM
UEFA Champions League: युरोपातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले
माद्रिद : युरोपातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या जगातील अव्वल खेळाडूंनी आपापल्या संघाला अंतिम आठ संघात प्रवेश मिळवून देताना जेतेपदाच्या दिशेनं वाटचाल कायम राखली आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डो आणि मेस्सी समोर येतात का, याची उत्सुकता लागली होती. मात्र, जाहीर झालेल्या ड्रॉनंतर उपांत्यपूर्व फेरीत हे खेळाडू समोरासमोर येण्याची शक्यता मावळली आहे, परंतु अंतिम फेरीत बार्सिलोना आणि युव्हेंटस हे क्लब जेतेपदासाठी भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.युव्हेंटसने 0-2 अशा पिछाडीवरून अॅटलेटिको माद्रिदवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. परतीच्या सामन्यात रोनाल्डोनं हॅटट्रिक साजरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. रोनाल्डोनं रेयाल माद्रिदची साथ सोडल्यामुळे स्पॅनिश क्लबला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. रेयाल माद्रिदला नमवणाऱ्या अयाक्स क्लबशीच उपांत्यपूर्व फेरीत युव्हेंटसला भिडावे लागणार आहे. अयाक्स क्लब आणि युव्हेंटस यांच्यास उपांत्यपूर्व फेरीचा सामना, 2003 नंतर अयाक्स क्लबने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आणि घरच्या मैदानावर त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. 1996च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत उभय क्लब भिडले होते आणि निर्धारित वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये युव्हेंटसने बाजी मारली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यात इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिव्हरपूल क्लब उपांत्यपूर्व फेरीत पोर्तोचा सामना करणार आहे. लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनासमोर इपीएल माजी विजेत्या मँचेस्ट युनायटेडचे आव्हान आहे. 2007-08 च्या उपांत्य फेरीनंतर बार्सिलोना आणि युनायटेड प्रथमच लीग सामन्यात समोरासमोर येणार आहेत. 2009 आणि 2011 च्या अंतिम फेरीत हे संघ समोरासमोर आले होते आणि दोन्ही वेळेला मेस्सीच्या खेळाच्या जोरावर बार्सिलोनाने बाजी मारली. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टोदनहॅम आणि मँचेस्टर सिटी समोरासमोर आहेत.बार्सिलोना आणि युव्हेंटस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत सामना होणार नसला तरी ड्रॉनुसार हे क्लब अंतिम फेरीत भिडू शकतील. त्यामुळे रोनाल्डो व मेस्सीच्या चाहत्यांना धमाकेदार सामना पाहण्याची संधी मिळू शकते. उपांत्य फेरीत टोदनहॅम/ मँचेस्टर सिटी आणि अयाक्स/ युव्हेंटस यांच्यातील विजेता संघ भिडतील, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बार्सिलोना/मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल/पोर्तो यांच्यातला विजयी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यामुळे अंतिम फेरीत बार्सिलोना व युव्हेंटस यांच्यात चुरस पाहायला मिळेल.