नवी दिल्ली : हौशी ते व्यावसायिक अशी भारतीय संघाची वाटचाल आश्चर्यचकित करणारी आहे. १७ वर्षे विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय फुटबॉल संघात प्रभावित करण्याची क्षमता आहेच शिवाय समर्पण वृत्तीमुळे संघ देखणी कामगिरी करू शकतो, असे मत भारतीय संघाचे माजी स्ट्रायकर आय. एम. विजय यांनी व्यक्त केले. आयोजनामुळे देशात फुटबॉलचा दर्जा उंचावेल, असेही त्यांनी म्हटले.१९८९ ते २००३ या काळात देशासाठी ७९ सामन्यात ४० गोल नोंदविणारे विजयन यांना देशातील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर मानले जाते. भारतीय खेळाडू कामगिरीच्या बळावर जगाचे लक्ष वेधून घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले,‘आम्ही यजमान आहोत. आयोजनासाठी सर्वतोपरी झोकून दिले आहे. खेळाडूही उत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज आहेत. या आयोजनातून भारतीय फुटबॉलला नवी उभारी मिळेल, असे वाटते. भारतीय संघाला सराव आणि तयारी करताना मी पाहिले आहे. त्यांचा खेळ पाहून मी प्रभावित झालो. ही मुले विश्वचषकात दमदार कामगिरी करतील.’ भारतीय फुटबॉलमधील आव्हानांबाबत विचारताच ४८ वर्षांचे विजयन म्हणाले, ‘खेळातील व्यावसायिकपणा बघून मी सर्वाधिक प्रभावित झालो आहे.’
‘भारतीय संघात प्रभावित करण्याची क्षमता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 3:49 AM