ठळक मुद्देभारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना सायंकाळी 6.15 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
मुंबई : भारतीयफुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. सोमवारी भारतीय संघाने AFC U-16 Championship स्पर्धेत दक्षिण कोरियाला नमवल्यास ते स्वप्न सत्यात उतरणार आहे. बिबिआनो फर्नांडेस यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 2002 मध्ये भारताने AFC U-16 Championship स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि त्याहीवेळेला दक्षिण कोरियाकडून भारताला 3-1 असा पराभव पत्करावा लागला होता. सोळा वर्षानंतर भारतीय कुमार संघाने ही कामगिरी केली आहे. आज विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि या कामगिरीसह संघाचा 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान आहे.
प्रशिक्षक बिबिआनो यांनी भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, ''कोरियाचा संघ फेव्हरिट असला तरी आम्ही विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आमच्या खेळाडूंवर माझा विश्वास आहे. " भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 6.15 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 2 आणि 2HD वाहीनींवर करण्यात येणार आहे.