कोलकाता : क्रिकेटवेड्या मुंबईकरांवर १५ सप्टेंबरच्या दिवशी फुटबॉलज्वर चढणार होता. यास कारणही तसेच होते. या दिवशी व्यावसायिक फुटबॉल लीगमधील दोन अव्वल संघ रेयाल माद्रिद आणि क्लब बार्सिलोना एकमेकांविरुद्ध भारतीय क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच मुंबईमध्ये लढणार होते. परंतु, या सामन्यासाठी काही प्रमुख खेळाडू अनुपलब्ध असल्याने हा बहुप्रतीक्षित सामना तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.या एल क्लासिको सामन्याविषयी स्पर्धा आयोजक टीममधील एका अधिकारीने माहिती दिली, ‘या सामन्यासाठी काही खेळाडूंच्या अनुपस्थितीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे हा सामना १५ सप्टेंबरला होऊ शकणार नाही. या सामन्याचे आयोजन आता १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेआधी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येऊ शकते.’ दरम्यान, हा सामना भविष्यात होऊ शकेल की नाही, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.आयोजन संघातील अन्य एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, ‘आॅक्टोबर महिन्यात भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या आयोजनाची खूप कमी शक्यता आहे.’ स्पेनचेदिग्गज क्लब असलेले रेयाल माद्रिद आणि क्लब बार्सिलोना यांच्यातील सामना नेदरलँडचे दिग्गज आणि बार्सिलोनाचे स्टार खेळाडू जोहान क्रूएफ यांच्या आठवणीत खेळविण्यात येणार होता. (वृत्तसंस्था)हे दिग्गज खेळणार होते...स्पर्धा आयोजकांनी दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले होते, की या सामन्यात रॉबर्टो कार्लोस, रोनाल्डिन्हो, निकोलस अनेल्का, लुई फिगो, कार्लोस पुयोल, सिमाओ, फर्नांडो मोरिएंट्स आणि मायकल सालगाडो यांसारखे स्टार खेळाडू खेळणार होते.कोलकाता टू मुंबई...याआधी या सामन्याचे आयोजन कोलकाता येथे करण्यात आले होते. परंतु, येथे २८ आॅक्टोबरला १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार असल्याचे कारणाने हा सामना मुंबईला खेळविण्याचा निर्णय झाला.
...आणि रोमांचक सामना रद्द झाला, रेयाल माद्रिद वि. बार्सिलोना : मुंबईत भिडणार होते दिग्गज क्लब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 2:10 AM