मकाऊ : बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुस-या हाफमध्ये नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील साखळी लढतीत मंगळवारी मकाऊ संघाचा २-० ने पराभव केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचा हा सलग ११ वा विजय ठरला. बलवंतने ५७ व ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारताने पात्रता स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविताना ९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. भारतीय संघ आता स्पर्धेच्या २०१९ च्या मोसमासाठी पात्रता मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे.फीफा मानांकनामध्ये ९६ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला १८३व्या स्थानावर असलेल्या मकाऊ संघाविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात होते.यजमान संघाने पहिल्या हाफमध्ये भारताला यश मिळू दिले नाही. युगेनसन लिंगदोहच्या स्थानी मैदानावर आलेल्या बलवंतने भारताचे खाते उघडले. नारायण दासने ५७ व्या मिनिटाला दिलेल्या पासवर बलवंतने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.दुसरा गोल यजमान संघाच्या बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. बलवंतने ८२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूकडून चेंडू हिसकावत गोल नोंदवला.यजमान संघाने भारताचे मुख्य स्ट्रायकर सुनील छेत्री व जेजे लालपेखलुआ यांना मात्र गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारताला ३७ व्या मिनिटाला खाते उघडण्याची संधी होती, पण लिंगदोहने मारलेला फटका गोलपोस्टवर आदळला. तीन मिनिटानंतर नारायणने जेजेला चांगली संधी उपलब्ध करून दिली, पण त्यावर त्याला गोल नोंदविता आला नाही. (वृत्तसंस्था)
आशिया कप पात्रता फुटबॉल : बलवंतचे दोन गोल, मकाऊवर २-० ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 12:42 AM