नवी दिल्ली, दि. 31 - दोहा येथे मागच्या महिन्यात झालेल्या एएफसी २३ वर्षांखालील स्पर्धेत खेळलेल्या सहा युवा खेळाडूंना मकाऊविरुद्ध होणा-या आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघात निवडण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी होणा-या या सामन्यासाठी भारतीय संघ आज शुक्रवारी बँकॉकमार्गे मकाऊकडे रवाना होईल. म्यानमार आणि किर्गिस्तानविरुद्ध लागोपाठ विजयानंतर भारतीय संघ ‘अ’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मकाऊला कमकुवत मानण्याचे कारण नाही, असे कोच स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी खेळाडूंना बजावले आहे. मकाऊ घरच्या मैदानावर खेळणार असल्याने प्रेक्षकांची साथ त्यांनाच लाभेल. घरच्या मैदानापेक्षा दुस-या देशात खेळण्याचे दडपण वेगळेच असते, पण आव्हानाची संघाला जाणीव आहे.’ भारताने १२ आॅगस्टपासून मुंबईत तयारी सुरू केली. यादरम्यान मॉरिशस तसेच सेंट किट्स आणि नेव्हिसविरुद्ध तिरंगी आंतरराष्टीय मालिकाही खेळली. माजी कर्णधार आय. एम. विजयन हे निरीक्षक म्हणून संघासोबत मकाऊला जाणार आहेत.(वृत्तसंस्था) भारतीय फुटबॉल संघ गोलकीपर : गुरप्रीतसिंग संधू, सुब्रत पॉल, अल्विनो गोम्स. बचाव फळी : प्रीतम कोटाल, लालरुथारा, संदेश झिंगन, अनस इदाथोदिका, अर्णब मंडल, एस. रंजनसिंग, नारायण दास, जेरी लालरिंजुआला. मधली फळी : उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, निखिल पुजारी, यूजेनसन लिंग्डोह, रॉलिन बोर्जेस, मोहम्मद रफीक, जरमनप्रीतसिंग, अनिरुद्ध थापा, हालीचरण नार्जरी. आक्रमक फळी : जेजे लालपेखलुवा, सुनील छेत्री, रॉबिनसिंग आणि बलवंतसिंग.
आशिया कप पात्रता फेरी : मकाऊविरुद्ध सहा युवा खेळाडूंचा भारतीय फुटबॉल संघात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 9:46 PM