नवी दिल्ली : अमरजितसिंग कियाम याला फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपदी निवड झाल्याने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्याने म्हटले. संघाचे प्रशिक्षक डी. मातोस यांनी खेळाडूंमध्ये मतदान घेतले. त्यात कर्णधार म्हणून त्याला सर्वात जास्त पसंती मिळाली.अमरजित याने सांगितले की, ‘जेव्हा प्रशिक्षकांनी मला सांगितले की, मला कर्णधार म्हणून निवडले आहे. तेव्हा मी आश्चर्र्यचकीत झालो होतो. हा माझ्यासाठी शानदार अनुभव होता. आम्ही संघ म्हणून खेळतो आणि जिंकतो या ठिकाणी वैयक्तिक खेळ जास्त महत्त्वाचा नसतो. संघाची मजबुती ही या एकतेतच आहे.’ मणिपूरच्या थाऊबाल जिल्ह्यातील हाओखा ममांग गावाच्या अमरजित याचा हा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर त्याची आई त्याच्या फुटबॉलबाबतच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मासे विक्री करते.अमरजित याने सांगितले की,‘संघाची गरज असेल तेव्हाच मी बोलतो. मला वाटते की सर्वांनीच आपल्या भूमिकेचे नेतृत्व करावे. प्रत्येकाने आपल्या भूमिकेत शिरले पाहिजे’ग्रुप ए मधील अन्य मजबूत संघांबाबत विचारणा केली असता तो म्हणाला, ‘यजमान म्हणून भारत या स्पर्धेत दमदार खेळ करेल. विश्व चषकात सहभागी होणाºया प्रत्येक संघाचे आव्हान असते. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान करतो. ते कडवे प्रतिस्पर्धी आहेत. आम्ही जिंकण्यासाठीच खेळ करणार आहोत. आणि सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत खेळ करू’अमरजितने सांगितले, ‘मी विचार करायचो की, एक दिवस मी देशाचे प्रतिनिधित्व करेल.आणि आता मी १७ वर्षे आतील विश्वचषकासाठीच्या संघात आहे. मला विश्वास होत नाही. हे एका स्वप्नासारखे आहे.’ अमरजितने शाळेत असतानापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर २०१० मध्ये तो चंदीगढमधील फुटबॉल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेला. तेथे त्याला मोफत राहण्याची,शिकण्याची सुविधा मिळाली.स्पर्धेतील गटसाखळी फेरी भारतीय संघासाठी आव्हानात्मक ठरेल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या यजमानांपुढे अमेरिका, कोलंबिया आणि माजी विजेत्या घाना यांचे तगडे आव्हान असेल. ‘आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरु,’ असा विश्वास अमरजितने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)- विश्वचषकाला ६ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यात भारताचे सामने पहिल्या दिवसापासून होतील. साखळी फेरीतील भारताचे सामने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.‘जेथे आवश्यकता आहे,तेथेच मी बोलतो. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने स्वत:ला कर्णधार मानून खेळ केला पाहिजे,’ असेही कर्णधार अमरजित याने सांगितले.
कर्णधारपदामुळे आश्चर्यचकीत, मतदानामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:10 AM