माद्रिद - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर क्लब स्पर्धांची जत्रा फुटबॉल शौकिनांसाठी भरणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्लब तयारीला लागले आहेत. ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो व्हॅलव्हेर्डे यांनी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात मेस्सीला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तो सरावासाठीही हजर नव्हता. मेस्सीसह विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू अमेरिकेत होणा-या या स्पर्धेत खेळणार नाहीत. बार्सिलोनाने नव्याने करारबद्ध केलेले ऑर्थर मेलो आणि क्लेमेंट लेंग्लेट यांना आपली छाप पाडण्याची आवश्यकता आहे. लुईस सुआरेझ, फिलिप कुटीन्यो, जिरार्ड पिक्यू, सेर्गियो बुस्क्यूट आणि जॉर्डी अल्बा यांच्यासह सॅम्युयल उम्टीटी, ओस्मान डेम्बेले आणि इव्हान रॅकिटीच हे विश्वचषक स्पर्धेतील फायनलीस्टही चॅम्पियन्स कपसाठी बार्सिलोनासोबत जाणार नाहीत. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे खेळाडू सुट्टीवर आहेत. जर्मनीचा गोलरक्षक मार्क-आंद्रे टेर स्टीगन हा क्लबसोबत असणार आहे. बार्सिलोना क्लब मंगळवारी पोर्टलँडसाठी रवाना होणार आहे. तेथे ते नाइके हेडक्वाटर्स येथे सराव करतील आणि शनिवारी लॉस अँजिलीससाठी रवाना होणार आहेत.
बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:03 AM