जलपायगुडी (पश्चिम बंगाल) : भारताचे दहा वर्षांपूर्वी प्रतिनिधित्व करणारी फुटबॉलपटू कल्पना रॉय (२६) उदरनिर्वाहासाठी जलपायगुडी जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला चहाचे दुकान चालवत आहे. कल्पना रॉय सुमारे ३० मुलांना प्रशिक्षणही देत असून स्वत:ला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती दिवसातून दोनवेळा प्रशिक्षण देते.कल्पनाला पुन्हा एकदा देशाकडून खेळायचे आहे. २०१३ मध्ये एका सामन्यात उजव्या पायाला गंभीर इजा झाल्यामुळे कल्पनाची फुटबॉल कारकिर्द थांबली. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने हा सामना आयोजित केला होता. ‘त्यातून मला बरे व्हायला वर्ष लागले. उपचारांसाठी कोणाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही. तेव्हापासून मी चहाचे दुकान चालवते,’ असे कल्पनाने सांगितले. कल्पनाचे वडील चहाचे दुकान चालवायचे. वाढत्या वयामुळे आलेल्या शारीरिक तक्रारींमुळे ते काम करीत नाहीत.वडिलांच्या देखभालीसाठी कल्पनाने लग्न केले नाही. कल्पना २००८ मध्ये १९ वर्षांखालील चार आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. कल्पना सकाळी १० वाजता ते सायंकाळी ४ वाजता चहा विकते. या आधी ती प्रशिक्षण देते. त्यातून तिला महिन्याला ३ हजार रुपये मिळतात.कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार?कल्पना म्हणाली, ‘मी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचणी द्यायला संपर्क साधला होता. परंतु, आर्थिक समस्येमुळे मला जाता आले नाही. कोलकात्यात राहण्यासाठी मला जागा नाही. याशिवाय मी येथून गेले तर माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेईल? सध्या माझ्या वडिलांची प्रकृतीही बरी नसते.’ पाच बहिणींमध्ये कल्पना सगळ्यात धाकटी असून तिच्या चार बहिणींचे लग्न झाले आहे.
महिला फुटबॉलपटू कल्पनाला चहा दुकानाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 4:34 AM