मुंबई : बीपीन बीएमसी केंद्राने अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात कांदिवली केंद्राचे आव्हान पेनल्टी-शूटआऊटमध्ये ५-३ असे परतवून लावत बीपिन फुटबॉल अकादमीतर्फे आयोजित ३२व्या आंतरकेंद्र फुटबॉल चषकाचे विजेतेपद पटकावले.
चर्चगेट येथील कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात, बीएमसी केंद्राने निर्धारित वेळेत कांदिवली केंद्राला २-२ असे बरोबरी रोखले होते. अभिषेक दुसांजीने केलेल्या दोन गोलमुळे बीएमसी केंद्राने सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र नॅथन ब्रॅगेंझा आणि अखेरच्या क्षणी रावल अल्मेडा यांनी केलेल्या गोलमुळे कांदिवली केंद्राने सामन्यात झोकाने पुनरागमन करत बरोबरी साधली होती.
सामना सडन-डेथमध्ये गेल्यानंतर बीएमसी केंद्राने पूर्णपणे वर्चस्व गाजवत बीपिन आंतरकेंद्र चषकावर नाव कोरले. पेनल्टी-शूटआऊटमध्ये बीएमसी केंद्राकडून विजू पवार, सुजल सिंग, रफिक मन्सूरी, रोहित मंडल, आझाद अन्सारी यांनी गोल केले. कांदिवलीकडून एराल्ड नारंग, शफी मोहम्मद, केथ फर्नांडेस यांनाच गोल करता आले.१६ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने सेंट्रल विभागाचा २-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. हे दोन्ही गोल प्रियांका कनोजिया हिने केले. विजेत्या बीएमसी केंद्राला चषक देऊन भारतीय युवा संघाचा माजी गोलरक्षक आयरेनो वाझ तसेच कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचे सचिव जया शेट्टी यांच्या हस्ते गोरवण्यात आले.
तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, कांदिवली केंद्राने विलेपार्ले केंद्राचा टायब्रेकरमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या दुसºया सामन्यात बीएमसी केंद्राने कुलाबा-चर्चगेट केंद्रावर ३-० असा विजय मिळवून आरामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
सर्वोत्तम खेळाडूचे पुरस्कार : रफिक मन्सुरी, विरार केंद्रसंघातील सर्वोत्तम खेळाडू : महानगरपालिका केंद्र - अभिषेक देसांजी, कांदिवली केंद्र - मोहम्मद सैफ, कुलाबा/चर्चगेट केंद्र - संजु राठोड, विले पार्ले केंद्र - शर्माद भोयर, कांदिवली केंद्र - भरत, विरार केंद्र - धैर्या बारी, उल्हासनगर - अभिजित शिंदे.