नवी दिल्ली : गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमची खराब अवस्था पाहून फिफा आणि १७ वर्षांखालील विश्वचषक स्थानिक आयोजक समितीने (एलओसी) २५ आॅक्टोबरला येथे होणारा ब्राझील विरुध्द इंग्लंड हा उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेतला. कोलकाता येथेच स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळविण्यात येणार आहे.फिफाने सोमवारी याविषयी माहिती देताना सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या मैदानाची अवस्था वाईट झाली आहे. संपूर्ण मैदानाची पाहणी केल्यानंतर आम्ही २५ आॅक्टोबरला येथे होणारा ब्राझील - इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी ५ वाजता हा सामना खेळविण्यात येईल.’गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे सतत पाऊस पडत असून माली आणि घाना यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भरपावसात खेळविण्यात आला. घानाने १-२ असा झालेल्या पराभवानंतर गुवाहाटी मैदानाच्या स्थितीविषयी तक्रारही केली होती. (वृत्तसंस्था)> खेळाडूंची सुरक्षितता आणि खेळाची सर्वोत्तम परिस्थिती निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांशी चर्चा केल्यानंतर या सामन्याचे स्थान बदलण्यात आले,’ अशी माहितीही फिफाने यावेळी दिली.
ब्राझील - इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:27 AM