कोलकाता : उपांत्य फेरीत इंग्लंडविरुध्द झालेल्या अनपेक्षित एकतर्फी पराभवानंतर अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळालेला बलाढ्य ब्राझील संघ शनिवारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी झुंजार मालीविरुध्द भिडेल. ब्राझील आपल्या नेहमीप्रमाणे स्टायलिश आणि नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करेल, तर माली आक्रमक खेळासाठी ओळखले जात असल्याने हा सामनाही रोमांचक होईल.स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून गणना झालेल्या ब्राझीलला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी ते पूर्ण ताकदीने मालीविरुध्द भिडतील. विशेष म्हणजे भारतीय प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच ब्राझीलला मोठा पाठिंबा दिला असून मालीविरुद्धही प्रेक्षकांची पसंती ब्राझीललाच असेल. त्यामुळेच, अॅलन सूजा, लिंकन आणि पालिन्हो यांनी भारतीय प्रेक्षकांसाठी आम्ही कांस्य पदकासाठी आमचा सर्वोत्तम खेळ करु,’ असे वक्तव्य केले.ब्राझीलकडे अनेक गुणवान खेळाडू आहेत, मात्र लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. दुसरीकडे, मालीने आपल्या आक्रमक व ताकदवर खेळाच्या जोरावर सर्वांनाच प्रभावित केले आहे. (वृत्तसंस्था)
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावण्यासाठी ब्राझील, माली लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 04:06 IST