- गुरप्रीतसिंग संधूकुठल्याही खेळाडूच्या जीवनामध्ये सुधारणा होणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कधी थांबत नाही. फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे आणि ते त्याचे हकदारही आहे, पण तरी खेळाडूंनी आपल्या कामगिरीवर आत्मसंतुष्ट असू नये. गोलकीपर धीरज सिंगसह सर्व खेळाडूंसाठी आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी हे चांगले व्यासपीठ होते. पण, एका खेळाडूला ज्यावेळी वाटते की तो सर्वोत्तम खेळला ते त्याच्यातील सुधारणा होण्याची प्रक्रिया थांबण्याचे पहिले पाऊल असते. गोलकीपरची कारकीर्द संघर्षपूर्ण असते आणि धीरजलाही याचा अनुभव आला आहे. आता आपली कारकीर्द पुढे कशी फुलवायची हे सर्वस्वी धीरजच्या हातात आहे. आपल्यातील उणिवा दूर करण्यावर त्याने लक्ष केंद्रित करायला हवे. चांगले प्रशिक्षण मिळत असलेल्या स्थानाचा शोध घ्यायला हवा. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचे की आगेकूच करायची, हे सर्वस्वी धीरजवरच अवलंबून आहे. तो केवळ १७ वर्षांचा आहे ही त्याची जमेची बाजू आहे आणि सर्वांत धोकादायक बाबही हीच आहे की, तो केवळ १७ वर्षांचा आहे. या वयात समजून हुशारीने निर्णय घेण्याची गरज असते. गोलपोस्टपुढे तो प्रतिभावान दिसला. त्याची वेगवान हालचाल त्याचे शक्तीस्थळ आहे. त्याचसोबत तो खेळाला चांगल्याप्रकारे समजून घेतो.गरज भासली तेव्हा तो डी-बाहेर येण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते. हे दृश्य सुखावणारे आहे, पण अशा वेळी त्याला परिस्थितीवर नजर ठेवावी लागले. गोलकीपरसाठी केवळ फटके रोखणे महत्त्वाचे नाही तर नियंत्रणाबाहेर जाणारी परिस्थिती प्रभावी संवादाच्या माध्यमातून टाळणेही आवश्यक आहे. जर कुणाला विदेशात जाऊन आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळत असेल तर त्याने ही संधी वाया जाऊ द्यायला नको. चांगल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू तुम्ही मानसिक रूपाने सक्षम होता, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. मानसिकदृष्ट्या कणखर असाल तर कुठल्याही स्थितीवर नियंत्रण मिळवू शकता, पण ही बाब अनेकांच्या पचनी पडत नाही. चांगल्या व महान खेळाडूंमध्ये हाच फरक असतो.(टीसीएम)
कारकीर्द फुलविणे धीरजच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:17 AM