मस्कत : भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ०-१ असा पराभव पत्करावा लागला. यासह फिफा विश्वचषक २०२२ पात्रता स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. सुलतान काबूस क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात ३३व्या मिनिटाला मोहसिन अल घसानी याने केलेला गोल निर्णायक ठरला.विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या पहिल्या सत्रातील लढतीतही ओमानने भारताला २-१ असे नमविले होते. या पराभवानंतर भारतीय संघ ई गटामध्ये पाच सामन्यांतून ३ गुणांची कमाई करत चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे, आशियाई विजेते कतार सर्वाधिक १३ गुणांसह अव्वल, तर ओमान १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता पात्रता स्पर्धेची अखेरची फेरी शिल्लक असून भारताला केवळ तीन सामने खेळायचे आहेत. यातून भारताला जास्तीत जास्त ९ गुण मिळवता येतील. त्याचवेळी, २०२३ साली होणाºया आशिया चषक स्पर्धेला पात्र ठरण्याच्या शर्यतीत मात्र भारताचे आव्हान कायम आहे.दडपणाखाली खेळलेल्या या सामन्यात भारतीय संघ सातव्याच मिनिटाला पिछाडीवर पडणार होता. मात्र यावेळी, मोहसिनने पेनल्टी स्पॉटवर मारलेली किक गोलपोस्टच्या बारला लागल्याने ओमानने आघाडी घेण्याची संधी गमावली. यानंतर ओमानने सातत्याने आक्रमक हल्ले करत भारतावर दडपण कायम ठेवले. ३३व्या मिनिटाला मात्र भारतीय गोलक्षेत्रात मुसंडी मारताना मोहसिनने आधी केलेली चूक टाळताना भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंगला चकवून चेंडू गोलजाळ्यात धाडला. हाच सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.या गोलच्या जोरावर मध्यंतराला आघाडी राखल्यानंतर ओमानने संपूर्ण सामन्यात मिळवलेली आघाडी कायम राखली. मध्यंतरानंतर भारताने पुनरागमनाचे जोरदार प्रयत्न केले. परंतु, ओमानचा भक्कम बचाव भेदण्यात भारतीय आक्रमकांना अखेरपर्यंत अपयश आले. ओमानचा गोलरक्षक अली अल हाबसी याने जबरदस्त संरक्षण करताना भारतीय आक्रमकांच्या आव्हानातली हवा काढली. सामन्यातील दुसºया सत्रात भारतीयांनी चांगला खेळ करत चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण राखले. (वृत्तसंस्था)
भारतीयांचे आव्हान जवळपास संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:34 AM