नवी दिल्ली : चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये बार्सिलोनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने चेल्सीविरुद्धच्या सामन्यात आपले ' गोलशतक' साजरे केले. या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. या पराभवामुळे चेल्सी संघाचे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
या सामन्यात बार्सिलोनाच्या चाहत्यांना मेस्सीकडून मोठ्या अपेक्षा होता. मेस्सीनेही सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटात गोल करत चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. मेस्सीने या लीगच्या 123व्या सामन्यात शंभरावा गोल केला. युरोपातील प्रमुख स्पर्धांमध्ये 'गोलशंभरी' साजरी करणारा मेस्सी हा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्यांदा 'गोलशतक' करण्याचा मान पटकावला आहे. रोनाल्डोच्या खात्यात 152 सामन्यांमध्ये 117 गोल आहेत.
मेस्सीनंतर बार्सिलोनाच्या ओसमान डेम्बलीने गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाकडे 2-0 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा मेस्सीची जादू पाहायला मिळाली. मेस्सीने सामन्याच्या 63व्या मिनिटाला सामन्यातील दुसरा गोल करत बार्सिलोनाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
बार्सिलोना आणि चेल्सी यांच्यातील पहिला सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला होता. पण दुसऱ्या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा विजय मिळवला.