नवी दिल्ली - आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती. ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन केले आहे. फिफाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे.फिफा क्रमवारीत भारतीय संघ 97 व्या स्थानावर आहे आणि 75व्या क्रमांकावर असलेल्या चीनविरूद्ध खेळण्यासाठी हा संघ 8 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत बीजिंगला जाणार आहे. या सामन्याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय महासंघाने 13 ऑक्टोबरचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि चीन यांच्यात आत्तापर्यंत 17 सामने झाले आहेत आणि हे सर्व सामने भारतीय भूमीत झालेले होते. उभय संघ 1997 मध्ये नेहरू चषक स्पर्धेत कोची येथे अखेरचे एकमेकांविरूद्ध खेळले होते. भारताचा 16 वर्षांखालील संघ चीनमध्ये नुकत्याच झालेल्या चार देशांच्या निमंत्रित स्पर्धेत सहभाग झाला होता. यामध्ये थायलंड आणि कोरिया प्रजासत्ताक संघांचाही समावेश होता. ऑक्टोबरमध्ये होणारा हा मैत्रीपूर्ण सामना भारताच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ही स्पर्धा जानेवारी 2019 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. भारताला चीनविरूद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. 17 पैकी 12 सामने चीनने जिंकले आहेत आणि पाच सामने बरोबरीत सुटले आहेत. मात्र, भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता चीनची कसोटी लागणार आहे. भारतीय संघाने जून 2016 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत सलग 12 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांनी ही खेळाडूंसाठी मोठी संधी असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, आशियाई चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाला यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. खेळाडू या संधीचे सोनं करतील असा मला विश्वास आहे.