जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या फुटबॉल संघाचे सदस्य आणि लिड्स युनायटेड क्लबचे दिग्गज फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.
''गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु आज सकाळी त्यांचे निधन झाले,'' असे लिड्स क्लबने सांगितले.
नॉर्मन यांनी 1964 ते 1965 कालावधीत इंग्लंडच्या 23 वर्षांखालील आणि 1965 ते 1974 या कालावधीत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी 1980 ते 1990 मध्ये ते संघाचे व्यवस्थापक होते.