नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन पुढीलवर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत भारतातच होईल, असे फिफाने मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.आधी या स्पर्धेचे आयोजन २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार होते. जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन होताच मागच्या महिन्यात स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेचे मूळ पात्रता नियम कायम राहणार असून एक जानेवारी २००३ किंवा त्यानंतर ते ३१ डिसेंबर २००५पूर्वी जन्मलेले खेळाडू विश्वचषकात सहभागी होऊ शकतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य समूहाने केलेल्या शिफारशींच्या आधारे नव्या प्रस्तावित तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत १६ संघांचा समावेश राहणार असून पाच शहरांमध्ये आयोजन होईल. त्यात कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबईचा समावेश असेल. यजमान देश या नात्याने भारताला स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.विश्वचषकाच्या नव्या तारखांची घोषणा होताच क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी दिली आहे. टिष्ट्वट करीत रिजिजू म्हणाले, ‘स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्याची हमी देतो.’(वृत्तसंस्था)‘विश्वचषकाचे आयोजन उत्कृष्टपणे होईल, याची हमी देतो. स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर झाल्याचे ऐकून आनंद झाला. यासाठी पाठिंबा दर्शविणाऱ्या सर्वच हितधारकांचा आभारी आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि स्थानिक आयोजन समिती यशस्वी आयोजनासाठी कटिबद्ध आहे.भारतात महिला फुटबॉलचा विकास आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी विश्वचषक हे उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल.’- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष एआयएफएफ
coronavirus: १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक भारतातच, फिफाचे शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:09 AM