नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वश्रूत असाच दिग्गज फुटबॉलपटू. अनेक जणांच्या गळ्यातील तो ताइत आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांचे मने जिंकली आहेत. पण आता अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, याच रोनाल्डोने बनावट कंपन्या बनवल्या होत्या. या बनावट कंपन्या बनवून तो आपली कमाई टॅक्स भरावा लागू नये, म्हणून लपवत होता. पण आता याप्रकरणी रोनाल्डो दोषी ठरला आहे.
कर चोरी केल्याप्रकरणी रोनाल्डो दोषी ठरला आहे. 2011 ते 2014 या कालावधीमध्ये रोनाल्डोने 14.7 मिलियन युरोचा टॅक्स लपवला होता, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे रोनाल्डोला आता कडक शिक्षा करण्यात आली आहे. रोलाल्डोला 23 महिन्यांची कैद व्हावी, असा निकाल न्यायालयाने दिला होता. पण आता रोनाल्डोला 23 महिने कैद होणार नाही, त्यासाठी त्याला 18.8 मिलियन युरो (म्हणजेच 152 कोटी रुपये) एवढा दंड भरावा लागणार आहे.
रोनाल्डोवर यापूर्वी बलात्काराचा आरोपही लावण्यात आला होता. रोनाल्डोने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप अमेरिकेच्या कॅथरीन मायोरगाने केला आहे. ही घटना 2009 साली घडल्याचे कॅथरीनने सांगितले होते. 2009 साली लास वेगास येथील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप कॅथरीनने केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या अमेरिकेचे पोलीस करत आहेत.