मोनॅको - रेयाल माद्रिदचा माजी आणि युव्हेन्टस क्लबचा आजी खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात अपयश आले. माद्रिदला सोडचिठ्ठी दिल्यानंतर युरोपातील त्याची लोकप्रियता कमी होण्याचे हे संकेत म्हटले जात आहेत. २०१७-१८ या हंगामातील युरोपातील सर्वोत्तम खेळाडूच्या अव्वल तीन नामांकनात असूनही रोनाल्डोला हार मानावी लागली.
काही दिवसांपूर्वी २०१७-१८ च्या सर्वोत्तम गोलचा पुरस्कार रोनाल्डोने नावावर केला होता आणि खेळाडूचा पुरस्कारही त्याला मिळेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र यावेळी बाजी कोणी दुसऱ्यानेच मारली. माद्रिदला विक्रमी सलग तिसरे जेतेपद जिंकून देण्यात रोनाल्डो इतकाच खारीचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूला हा मान मिळाला.
क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत घेऊन जाणारा ल्युका मॉड्रीचला २०१७-१८ च्या युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. या शर्यतीत रोनाल्डोसह लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह हाही होता. या पुरस्कारासाठी चॅम्पियन्स लीगमधील प्रशिक्षक आणि युरोपातील काही निमंत्रित पत्रकारांनी मतदान केले.
" हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हा पुरस्कार जिंकल्याचा अत्यंत आनंद होत आहे आणि अभिमानह्रे वाटत आहे, "अशी प्रतिक्रिया मॉड्रीचने दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात माद्रिद क्लबचाच प्रभाव दिसला. त्यांच्या गोलरक्षक कायलर नव्हास, बचावपटू सर्गियो रामोस, मध्यरक्षक मॉड्रिच आणि आक्रमणपटू रोनाल्डो यांनी वैयक्तिक पुरस्कार जिंकली.