Euro 2020, Cristiano Ronaldo makes history : गतविजेत्या पोर्तुगाल संघानं यूरो 2020त विजयाने सुरुवात केली. पोर्तुगालनं कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या दोन गोलच्या जोरावर हंगरी संघावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रोनाल्डोनं वर्ल्ड रेकॉर्डची नोदं केली. पाच युरोपियन चॅम्पियनशीप खेळणारा तो जगातील पहिलाच खेळाडू बनला आणि त्यानंतर सामन्यात दोन गोल करून त्यानं यूरो स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल्सचा विक्रमही नावावर केला. त्यानं मिचेल प्लाटिनी यांचा 9 गोल्सचा विक्रम मोडला.
पहिल्या सत्रात रोनाल्डोनं गोल करण्याच्या दोन सोप्या संधी गमावल्या, 84व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते. बोरुसिया डोर्टमंड क्लबकडून खेळणाऱ्या राफेल गुरेईरोनं हंगरी संघाची बचावफळी भेदली अन् 84व्या मिनिटाला पोर्तुगालचे गोलखाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोनं गोल करून ही आघाडी 2-0 अशी मजबूत केली. भरपाई वेळेत रोनाल्डोनं अप्रतिम गोल करून पोर्तुगालच्या विजयावर 3-0 असा शिक्का मारला.
रोनाल्डोनं एकाच सामन्यात मोडले विक्रम- यूरो स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल्सचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर, प्लॅटिनी यांचा 9 गोल्सचा विक्रम मोडला- पाच वेगवेगळ्या यूरो स्पर्धेत सहभाग घेणारा पहिलाच खेळाडू- यूरो + वर्ल्ड कप असे सर्वाधिक 39 सामने खेळणारा खेळाडू, श्वेनस्टेइगरचा 38 सामन्यांचा विक्रम मोडला- यूरो स्पर्धेतील एकाच सामन्यात दोन गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू. रोनाल्डोनं 36 वर्ष व 130 दिवसांचा असताना ही किमया केली. याआधी हा विक्रम युक्रेनच्या अँड्री शेव्चेंको यानं 35 वर्ष व 256 दिवसांचा असताना 2012साली स्वीडनविरुद्ध दोन गोल केले होते.